सोलापूर – पीपीई कीट परिधान करून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील सहा मोबाइल शॉपी फोडत सुमारे 50 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. लॉकडाऊनमधून आता कुठे व्यापारी नव्या उमेदीने व्यवसायाला लागले असतानाच चोरट्यांनी लुट केल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास सर्वप्रथम जुना बोरामणी नाका चौक परिसरातील युनिक एन्टरप्रायझेस हे दुकान चोरट्यांनी फोडले. यातील विविध कंपन्यांचे 40 ते 50 मोबाइल हॅन्डसेट आणि रोख रक्कम लंपास केली आहे.
यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने दक्षिण कसब्यात बालाजी दत्त मंदिरानजीक असलेले गायत्री कॉम्प्युटर्स दुकानात चोरी केली. यानंतर चौपाड विठ्ठल मंदिर नजीक नवीपेठेतील अक्षय एंटरप्रायझेस या दुकानाचे शटर उचकटून 40 मोबाइल हॅन्डसेट घेवून पोबारा केला. पुढे हीच गाडी घेवून या टोळीने जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील धृव हॉटेल समोरील ज्योती टेलिकॉम शो रुम आणि जयसेल मल्टी ब्रॅंड ही दोन्ही दुकाने फोडली.
चोरट्यांनी ज्योतीमधून डेमो पीस, टॅब आणि मोबाईल, तर जय सेल्समधून विविध कंपन्यांचे 40 ते 50 मोबाइल लंपास केले. यानंतर चोरट्यांनी विजापूर रस्त्यावर असलेल्या एस. जी. सेल्स हे लॅपटॉप मोबाइलचे दुकान फोडले. या ठिकाणीही 30 ते 35 मोबाइल चोरट्यांनी लंपास केले आहेत.