करोना परिस्थितीचा चोरट्यांनी उठवला फायदा; शहरात घरफोड्यांचे सत्र

पुणे -लॉकडाऊननंतर अनेक नागरिक खबरदारी म्हणून मूळगावी गेले आहेत. यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांमधील सदनिका बंद अवस्थेत आहेत. याचाच फायदा चोरट्यांनी उठवला आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर परगावी गेलेले नागरिक जसजसे परत येत आहेत तसतशा घटना उघडकीस येत आहेत. परप्रांतीय सुरक्षारक्षकही गावाकडे गेल्याने अनेक सोसायट्या सुरक्षारक्षकाविना आहेत. याचाही चोरट्यांना फायदा झाल्याचे दिसले. मागील 15 दिवसांत घरफोडी करणाऱ्यांनी हडपसर, कोंढवा, उंड्री, वानवडी आणि महंमदवाडी परिसराला टार्गेट केले आहे. यामुळे बंदोबस्ताच्या ताणातून नुकतेच बाहेर पडलेले पोलीसही हतबल झाले आहेत. मे महिन्याच्या 1 ते 28 तारखेदरम्यान 11 घरफोड्या, 6 चोऱ्या आणि 16 वाहनचोरीच्या घटना घडल्या.

दरम्यान, महंमदवाडी येथे एका घटनेत स्थानिक नागरिकांना तिघा चोरट्यांची एक गॅंग मध्यरात्री परिसरातील घरांची लुटालूट करत असल्याची दिसली. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस आणि नागरिकांनी तासभर त्यांचा वाहनांवरून शोध घेतला. मात्र ते पळूण जाण्यात यशस्वी झाले. अशीच एक घटना उंड्री येथे घडली. चोरटे घरांचे दरवाजा उचकटताना आढळून आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. करोणा विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर अनेक कैद्यांना जामिनावर सोडले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जामिनावर बाहेर पडलेल्या कैद्यांकडून पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू झाले आहे. जामिनावर बाहेर पडलेल्या दोघांचे खूनही झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यास सुरुवात केली आहे.

चंदननगरमध्ये सव्वापाच लाखांची घरफोडी
चंदननगरमध्ये सव्वापाच लाखांची घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी राजश्री गिते (30, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांचे घर 28 ते 31 मेदरम्यान बंद होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या घराच्या टॉयलेटच्या मागच्या खिडकीतून आत प्रवेश केला. यानंतर बेडरूमच्या कपाटातील 5 लाख 19 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादी या एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतात. लॉकडाऊन शिथिल झाल्याने त्या घरबंद करून माहेरी रहायला गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांना घरफोडी झाल्याचे आढळले.

Leave A Reply

Your email address will not be published.