पिंपरी -वाहनचोरीच्या गुन्ह्यांत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु सोबतच प्रकर्षाने जाणविणारी एक बाब म्हणजे एका विशिष्ट कारच्या सायलेन्सरकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. इको व्हॅन कुठेही लावली तरी चोरटे कारचा सायलेन्सर चोरून नेत असल्याची बाब समोर आली आहे.
या एकाच कारच्या सायलेन्सरच्या मागे चोरटे हात धुवून मागे लागले असल्याने “प्रभात’ने या सायलेन्सरमध्ये असे काय आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सायलेन्सरमध्ये असलेल्या मेटल डस्टसाठी या चोऱ्या होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इको कारचे सायलेन्सर चोरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायलेंसरमध्ये कॅटेलिटिक कन्वर्टर असतात. हे कन्वर्टर प्लेटिनम ग्रुप ऑफ मेटल्स (झच2) ने बनलेले असतात. प्लेटिनम, पॅलेडियम आणि रोडियमला संयुक्तपणे झच2 असे म्हटले जाते. याची किंमत खूप अधिक असते.
मेटलला मोठी मागणी
हेवी इंडस्ट्रीमध्ये या मेटलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आसपासच्या औद्योगिक परिसरासोबतच गुजरातमधील सूरत आणि अहमदाबादच्या औद्योगिक क्षेत्रात याची मोठी मागणी आहे. या मेटल डस्टची किंमत प्रति दहा ग्रॅम तीन ते सहा हजार रुपये आहे. याला लावण्यात आलेले सेंसर हे बाहेरच्या देशातून येतात. सेंसरची किंमत पाच ते दहा हजारांपर्यंत असते. मेटल डस्ट आणि सेंसर काढून घेतल्यानंतर पुन्हा त्या सायलेन्सरला जुन्या बाजारात विक्रीसाठी काढले जाते.
पुन्हा तोच सायलेन्सर विक्रीला
इको वॅनचा सायलेन्सर चोरल्यानंतर यातील महागडे सेन्सर आणि आणि मेटल डस्ट काढून घेतले जातात आणि सायलेन्सर थोडीशी डागडुजी करुन पुन्हा विक्रीसाठी काढले जातात. ज्यांच्या गाड्यांचे सायलेन्सर चोरीला गेले आहेत, ते नागरिक नवीन घेण्याऐवजी जुने सायलेन्सर विकत घेतात. चोरी केलेले जुने सायलेन्सर तब्बल तीस ते चाळीस हजाराला विकले जात असल्याचेही समोर आले आहे.
जुने सायलेन्सर घेऊ नका
नवीन सायलेन्सरला 57 हजार रुपये घालविण्यापेक्षा नागरिक जुने सायलेन्सर घेण्याला प्राधान्य देतात. परंतु जुन्या सायलेन्सरमधील सेन्सर आणि मेटल डस्ट काढून घेतलेली असल्याने हे प्रभावी ठरत नाही उलट इंजिनसाठी नुकसानदायकच ठरतात. त्यामुळे जुने सायलन्सर वापरणे वाहनासाठी अडचणीचे
ठरू शकते.