कोपरगाव -कोपरगाव शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि.17) पहाटे दोन वाहनचालकांना सुमारे 91 हजार रुपयांना लुटले. तसेच एक घर फोडून सुमारे 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ट्रकचालक लालजी तोमर (रा. भिंड, मध्यप्रदेश) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यात म्हटले की, कोपरगाव शहरातील औद्योगिक वसाहतीचा पत्ता माहीत नसल्यामुळे आपण ट्रक (क्र. एमएच- 15 ईजी- 4717) मुंबई रस्त्यावरील कातकडे पेट्रोल पंपानजीक थांबवला.
यावेळी ट्रकच्या दोन्ही बाजूंनी दोन अनोळखी चोरटे ट्रकच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी प्रथम शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी कत्तीचा धाक दाखवत 56 हजार रुपये चोरून नेले.
दरम्यान याच ठिकाणी याच वेळी वैभव फुला वाघ (रा. सटाणा) हे देखील आपली पिकअप व्हॅन (क्र. एमएच- 41 एजी- 2517) ही रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी थांबले असताना चार अनोळखी इसमांनी लोखंडी कत्तीचा धाक दाखवून 35 हजार रुपयांना लुटले.
शहरातील अंबिकानगर भागात राहणाऱ्या राजू शेख यांच्या घरात अनोळखी इसमाने घराच्या दरवाज्याची कडी उचकटून प्रवेश करून चार ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, रोख दहा हजार रुपये व दोन मोबाईल, असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना घटना रविवारी पहाटे दीड वाजेच्या दरम्यान घडली. शेख यांनी देखील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एकंदरीत लॉकडाऊनच्या काळामध्ये हाताला काम नसताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.