शिरूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत मंगळवारी (दि. 6) शिरूर शहरातील नगरपरिषद मंगल कार्यालयात गर्दीचा फायदा घेऊन पाच तरुणांच्या साडेचार लाख रुपये किंमत असलेल्या पंधरा तोळे तीन ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या. यासंदर्भात शिरुर पोलीस ठाण्यात अमित शिर्के (रा. कुंभारआळी, शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे.
शिवस्वराज्य यात्रेत पक्षाचे नेते येणार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे प्रवेशद्वारासमोर उभे होते. साडेसहा वाजता प्रमुख नेत्यांना आत नेताना गर्दी उसळली होती. त्यानंतर ते हॉलमध्ये गेले. कार्यक्रम सुरू झाल्यावर फिर्यादी यांना गळ्यातील चैन चोरीला गेल्याची लक्षात आले. दरम्यान कार्यक्रम संपल्यावर शिर्के यांच्याबरोबरच निलेश भुजबळ (रा. शिक्रापूर), अक्षय ढमढेरे (रा. रेव्हन्यू कॉलनी शिरूर), नवीन सोनवणे, (रा. वाजेवाडी), लालासाहेब गायकवाड (रा. केशवनगर मुंढवा) यांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्याचे उघड झाले. अधिक तपास हवालदार रूपनवर करीत आहेत.