थरमॅक्स चौक ते बिजलीनगर दरम्यानचा थरार
पिंपरी – मोटार चालकाला शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी मोटार पळविली. याबाबतची माहिती मिळताच थरमॅक्स चौक ते बिजलीनगर, चिंचवड असा पोलिसांनी सिनेस्टाईल थरारक पाठलाग केला. चार चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीची मोटारही हस्तगत केली. रविवारी (दि. 22) पहाटे ही घटना घडली.
यश सुरेश शेजवळ, (वय 20), अजय राजू लांडगे, (वय 20, दोघेही रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी), अनिकेत गौतम शिंदे, (वय 19, रा. पौड रोड, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजी आप्पासाहेब देवकते (वय 29, रा. चिखली) यांनी रविवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी देवकते यांनी आपली मोटार एमएच-12-एनबी-4037 ही थरमॅक्स चौकात रस्त्याच्या कडेला पार्क करून झोपले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चार चोरट्यांनी त्यांना शिवीगाळ, मारहाण करीत तसेच तलवारीचा धाक दाखवून तीन लाख रुपये किंमतीची मोटार जबरदस्तीने पळवून नेली.
पोलीस कर्मचारी नंदुर्गे यांनी ही माहिती तात्काळ पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला कळवली. चोरटे कारसह चिंचवडच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. तांत्रिक माहितीच्या आधारे प्राधिकरण बिट मार्शलला चिंचवड रस्त्यावर थांबवण्यात आले. प्राधिकरण बिट मर्शलला हुलकावणी देत चोरटे चिंचवडच्या दिशेने जाऊ लागले.
पोलिसांनी वाल्हेकरवाडी आणि चिंचवडगाव बिट मार्शलला याबाबत अगोदरच सतर्क करण्यात आले होते. पाच बिट मार्शल एकाच वेळी चोरट्यांचा पाठलाग करत होते. पोलिसांची आक्रमक भूमिका पाहत चोरट्यांनी सपशेल माघार घेतली. हनुमानस्वीट जवळ हा पाठलाग संपला आणि चोरलेल्या मोटारीसह चार जणांना ताब्यात घेतले.