मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, निरगुडसर या गावांमधील काही कृषीसेवा केंद्रे व इतर दुकानांची शटर उचकटून चोऱ्या करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. यावेळी साहित्याची विशेष चोरी झाली नसली तरी शटर व पत्रा उचकटल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
मंचर-पारगाव रस्त्यावरील गावडेवाडी हद्दीतील ढेरेअंबा येथे राजेश अंकुश गावडे यांचे स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानांचे दोन शटर तोडून किरकोळ रकमेची चोरी करण्यात आली आहे. गावडेवाडी फाटा येथे शेतकरी राजा कृषी सेवा केंद्र या दुकानाचे शटर तोडले आहे. लजीज बिर्याणी या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत त्याच्या शेजारी असलेल्या रिकाम्या दुकानाचे शटर तोडले आहे. अवसरी बुद्रुक येथील थापलिंग कृषी सेवा केंद्राचे पत्रा उचकटून चोरट्याने 5 हजार रुपये रक्कम चोरली आहे.
मेंगडेवाडी येथील प्रवीण कांताराम टाव्हरे यांच्या मोरया कृषी उद्योग या दुकानाचे शटर उचकटून किरकोळ रक्कम व मोबाईल चोरला आहे. तर निरगुडसर येथे तीन दुकाने फोडली असून निरगुडसर स्टॅंडसमोर मालन कसबे यांचे किराणा मालाचे दुकान फोडून त्यातून शीतपेय, कुरकुरे पुडे चोरले आहेत, भागेश मच्छिंद्र टाव्हरे यांच्या जय मल्हार कृषी उद्योग या दुकानाचे शटर उचकटून शटरचे नुकसान केले आहे. तर नवनाथ थोरात यांच्या बिरोबा ऍग्रो सर्विसेस या दुकानाचे पत्रा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
यापूर्वीही सातत्याने चोऱ्या
दरम्यान यापूर्वीही निरगुडसर, जारकरवाडी, अवसरी, परिसरात सातत्याने केबल चोरी, चंदन चोरी या घटना नेहमी घडत आहेत. परिसरातील नागरिक, दुकानदार भयभीत झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून चोरटे जेरबंद करण्याची मागणी होत आहे.