भोसरीतील घटना
पिंपरी – नागरिकांनी केलेल्या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी सहा वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली. संतोष हायसे (वय 30, पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संतोष हा मंगळवारी सकाळी भोसरीतील एका नागरिकाच्या घरात घुसला. त्या घरातील नागरिकांनी आरडा-ओरडा केला. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी त्यास मारहाण केल्याचे समजते. त्यास बांधून ठेवले. बेशुद्ध अवस्थेत संतोषला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मयताबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र तो मजूर असावा, अशी शक्यता आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल.