तुझ्यात त्याला बघत राहते

बघ नां,
तू आणि तो
दोघांवरही सारखंच प्रेम आहे रे….
तुम्ही पण तेवढंच प्रेम करता
कसं कुणाला दूर लोटू?
तुला माहितीये?
तो पण तुझ्याइतकाच
आतूर असतो भेटायला…
मला कवेत घ्यायला…
ती निश्‍चिन्त मिठी दोघांचीही
तो आवेगच इतका असतो
की मी नाहीच म्हणू शकत नाही..
तनूवर माळून घेते
मग मीही ते शहारे
रंध्रानांही फुटतात
मग असंख्य धुमारे
मनाच्या ढगांवर पहुडलेले हे जीव
एकरूप होत राहतात…
जगत राहतात.
कधी त्याच्यात तुला आणि…
कधी तुझ्यात त्याला बघत राहते.
कसे वेगळे काढू माझ्यापासून?
दोघेही हवेतच आहात मला
कशी जगू दोघांशिवाय?
पण एक नक्की की,
अपूर्ण मी दोघांशिवाय…
तुम्हा दोघांत फरक इतकाच की
तू वेळेचं घड्याळ बांधून येतोस
आणि तो वेळी अवेळी केव्हाही..
तुझ्या बरोबर त्याची साथ
आणि तो असताना तू
समीकरण खास

एकाचं राज्य तनावर तर
एक मनावर स्वार
नको घेऊ रे इतका भार
तो म्हणजे पाऊस आहे यार….

– निशिगंधा कल्लेद

Leave A Reply

Your email address will not be published.