जनतेच्या विकासाशी ‘त्यांना’ काही घेणे-देणे नाही

माजी आमदार अशोक पवार यांची आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यावर टीका

न्हावरे/वार्ताहर : सातबारे गोळा करून त्यातून पैसे कमावणे हाच धंदा शिरूरच्या विद्यमान आमदाराचा आहे. त्यांना जनतेचा विकास, विकासकामे यांचे काहीही घेणे-देणे नाही. अशी घणाघाती टीका शिरुरचे महाआघाडीचे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अँड. अशोक पवार यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यावर केली. न्हावरे येथून ‘घरोघरी शिवस्वराज्य वारी’ ला सुरुवात झाली. यावेळी झालेल्या सभेत माजी आमदार अँड. पवार बोलत होते. दरम्यान शिरूरच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये माजी आमदार अँड.पवार यांच्या घरोघरी शिवस्वराज्य वारीला मोठ्या प्रमाणावर उदंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सर्वच गावांमध्ये शेतकरी व सामान्य जनता घरोघरी शिवस्वराज्य वारीमध्ये उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.

आमदार पाचर्णे यांनी सत्तेचा वापर केवळ सातबारे गोळा करण्यासाठी केला. त्यातूनच पैसे कमावून आमदार पाचर्णे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, असा आरोप यावेळी अशोक पवारांनी केला. पुढे माजी आमदार अँड. अशोक पवार यांनी आमदार पाचर्णे यांच्यावर टीका करताना सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात नियोजन शून्य काम करणारा निष्क्रिय आमदार म्हणून बाबूराव पाचर्णे यांच्याकडे पाहिले जात आहे. तालुक्‍यात रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजांवर पाच वर्षात नियोजन शून्य काम झाले आहे. तालुक्‍यातील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. पाच वर्षात एकही नवा रस्ता झालेला नाही. फक्त घोषणाबाजी झाली आहे. विजेचाही लपंडाव सुरुच असून, वीज रोहित्र जळल्यानंतर ते अठ्ठेचाळीस तासात मिळणे बंधनकारक आहे. मात्र,पैसे देऊन ते आठदिवसांनी सुद्धा मिळत नाही.

अशीच स्थिती चासकमान डाव्या कालव्याच्या पाणी नियोजनाची आहे. पाण्याच्या नियोजनात आमदारकीची पाच वर्षे गेली. परंतू, पाण्याचे नियोजन करण्यात आमदार पाचर्णे असमर्थ ठरले आहेत. चासकमान कालव्याच्या पाण्याच्या वितरणाचा विषयच पाचर्णे यांना समजला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पाच वर्षात सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही अँड. पवार यांनी सांगितले.

यावेळी शिरुर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र काळे, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य व शिरुर बाजार समितीचे संचालक अँड. काकासाहेब कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब कोरेकर, घोडगंगाचे संचालक डॉ. गोविंदराजे निंबाळकर, शिरुर तालुका राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, बाजार समितीचे माजी संचालक महादेव जाधव, न्हावरे ग्रामपंचायतीचे सदस्य गोरख तांबे, न्हावरे विकास सोसायटीचे माजी संचालक पुनाजी डांगे यांची युतीच्या शासनाविरोधात भाषणे झाली. याप्रसंगी न्हावरे पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here