पुणे – ‘विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन दोडके यांना आपण खडकवासला मतदारसंघाचे आमदार झाल्यासारखे वाटल्याने त्यांनी विजयाचे फ्लेक्स लावले. त्यांनी एक दिवस आमदार झाल्याचा आनंद लुटला. मात्र, या मतदार संघातील जनतेने मोठ्या विश्वासाने मला निवडून दिल्याने मी पाच वर्षे आमदारकीचा आनंद घेणार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन दोडके यांच्यावर निशाणा साधला.
खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्यात लढत झाली.
मतदान पार पडल्यानंतर रात्रीतून दोडके यांनी विजयी झाल्याच्या आत्मविश्वासातून मतदार संघात रात्रीतून ठिकठिकाणी विजयाचे फ्लेक्स लावल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, निकाल जाहीर होताच भाजपचे भीमराव तापकीर यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. या विजयाबाबत तापकीर म्हणाले, “फ्लेक्स लावण्याचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून दोडके यांना आमदार झाल्याचा किमान एक दिवसाचा तरी आनंद घेता आला. मात्र, माझ्या विजयाने मी आमदारकीचा पाच वर्षे आनंद घेणार आहे.’
तेरावी फेरी तापकीरांसाठी ठरली “श्री गणेशा’
खडकवासला मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्याच फेरीत आघाडीचे सचिन दोडके यांनी 3 हजार 532 आघाडी घेतली. त्यानंतर 8 व्या फेरीपर्यंत तब्बल 10 हजारांपर्यंत दोडके यांनी आघाडी घेतल्यामुळे हे खडकवासला महायुतीच्या हातातून निसटला अशी शक्यता होती. परंतु, 12 व्या फेरीला तापकीर यांनी हे लीड तोडत बरोबरी गाठली आणि 13 व्या फेरीला 100 मतांनी आघाडी घेत खऱ्या अर्थाने विजयाचा श्री गणेशा केला. त्यानंतर तापकीर यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आघाडीचा आकडा वाढतच गेला आणि अंतिम फेरीअखेर त्यांचा विजय निश्चित झाला.