“ते’ कॉंग्रेस पक्षाचे मत नाही सॅम पित्रोडा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ

नवी दिल्ली: सॅम पित्रोडा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ सुरु असताना कॉंग्रेस पक्षाने पत्रक जारी करत हे त्यांचे वैयक्तित मत असून पक्षाशी त्याचे काही देणे-घेणे नाही, असे सांगत फारकत घेतली आहे. सॅम पित्रोडा यांनी 1984 च्या दंगलीचे काय घेऊन बसलात? ती दंगल तर घडून गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात काय केले हे देशाला सांगावे, असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. यावरुन सॅम पित्रोडा यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

1984 दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. याविरोधात सॅम पित्रोडा अथवा कोणीही व्यक्त केलेले मत किंवा वक्तव्य हे कॉंग्रेस पक्षाचे मत नाही, असे कॉंग्रेसने पत्रकात सांगितले. यावेळी कॉंग्रेसने पत्रकात 2002 गुजरात दंगलीचाही उल्लेख केला आहे.

1984 दंगल पीडितांना आणि 2002 गुजरात दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, सॅम पित्रोडा यांच्या या वक्‍तव्यावरून भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. कॉंग्रेस नेते सॅम पित्रोडा शीख विरोधी दंगल घडून गेली, झाली.. असं बेजबाबदारपणे कसे विचारू शकतात? असा प्रश्न भाजप नेत्यांनी विचारला आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोडा यांनी मात्र सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.