थेऊर (वार्ताहर) – अष्टविनायकातील चिंतामणी गणपतीच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या थेऊर (ता. हवेली) गावात करोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एका 27 वर्षाचा तरूण त्रास होतो म्हणून खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला असता त्याला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेले घरातील 9 नातेवाईक व 3 शेजारी अशा एकूण 12 जणांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असता यातील आणखी चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले की, संबंधित तरुण लोहगाव (पुुणे) येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याला त्रास होत असल्याने उपचारासाठी लोणी स्टेशन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तपासणीत तोबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राने थेऊर ग्रामपंचायतीचे मदतीने या परिसराचे निर्जंतुकीरण केले आहे. तसेच परिसर सील करण्यात आला आहे. संबंधित तरुण एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्यामुळे तेथे त्याच्या संपर्कात एकूण किती जण आले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आरोग्य विभागास त्याचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहेत.
नागरिकांनी न घाबरता शासनाच्या सुचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावयाचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे असून बाहेरील व्यक्ती थेऊरमध्ये रहावयास आलेस प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावयाची असून गर्दी टाळण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
– नितीन कुंजीर, उपसरपंच