बीजिंग : सध्याच्या युगात सगळीकडेच इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. २१ व्य शतकात इंटरनेट शिवाय काहीच शक्य नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या सेवांमध्ये दिवसेंदिवस अधुबनीकीकरण आणि नवनवीन बदल होताना पाहायला मिळत आहेत. 2G, 3G, 4G आणि आता 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.
चीनमधील तीन सरकारी कंपन्यांनी 1 नोव्हेंबर पासून 5G सेवा देण्यास सुरवात केली आहे. चायना मोबाईलने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसह 50 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली आहे.
5G सेवा घेणाऱ्या ग्राहकांना यासाठी दरमहा 128 युआन म्हणजे जवळपास 1300 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 5G सेवेसाठी चीनमध्ये प्रमुख स्पर्धक कंपन्या असणाऱ्या चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉर्न यांनीही ग्राहकांसाठी विविध योजना आणि ऑफर्स देत 5G सेवा सुरू केली आहे.
त्यांच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. बीजिंगमध्ये झालेल्या तंत्रज्ञान परिषदेत अधिकाऱ्यांनी तीन सरकारी कंपन्या शुक्रवारपासून ‘फाइव्ह जी’ सेवेची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. डिसेंबर अखेरीस चीनमधील पन्नासहून अधिक शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.