सुंदर आणि नितळ चेहऱ्यासाठी ‘हे’ आहेत, उपयोगी वनऔषधी

पुणे –  त्वचा म्हणजे आपल्या स्वास्थ्याचा आरसाच असतो. जरासा आजार झाला, अशक्तपणा आला की लगेच त्वचेवर परिणाम दिसतो. उलट आरोग्य चांगले असले की त्वचाही टवटवीत दिसते. शहरातल्या मेकअपच्या चेहऱ्यांकडे व खेड्यापाड्यातून थंडी, ऊन, वारा, पाऊस, धुळीत, शेतात काम करूनही तेथील स्त्रियांची कांती चांगली असते याला कारण त्या नकळतपणे वनौषधींचा वापर व सान्निध्यात काम करत असतात.

त्वचेसाठी वनौषधी, सुगंधी तेले वापरण्याची प्रथा आपल्याकडे फार पुरातन काळापासून अस्तित्वात होती. उटणी, मसाज, स्नान, अभ्यंग, प्रसाधने यांमध्ये वनौषधींचा वापर होतो. निसर्गाने असंख्य प्रकारच्या वनौषधी दिल्या आहेत.

 • चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोरफडीचा गर कापसावर घेऊन त्याने चेहेरा साफ करावा.
 • चेहऱ्याला मसाज करण्यासाठी देखील कोरफड जेल किंवा काकडी जेल वापरावी.
 • हातावर अर्धा ते एक चमचा कोरफड गर घेऊन दोन्ही हातावर पसरून ते चेहरा, मान, गळा या ठिकाणी लावावे. विशेषत: बाहेर जाण्याआधी किंवा मेकअपच्याआधी लावावे. यामुळे उन्हापासूनही संरक्षण होते.
 • एका काचेच्या ग्लासमध्ये गार पाण्यात चमचाभर त्रिफळा पावडर मिसळून ते चेहऱ्यावर लावावे. ऍस्ट्रींजंट म्हणून त्रिफळाचे पाणी असे वापरात येते.
 • चेहऱ्याला काहीही लावण्याआधी मनगटाजवळ लावून पाहावे व त्याची ऍलर्जी नसल्याची खात्री करून घ्यावी.
 • चेहरा वरचेवर थंड पाण्याने धुवावा. साबणाचा वापर कमी करावा. 1 चमचा कडुनिंबाची पावडर 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी बेसिनजवळ ठेवावे. ह्या पाण्याने वरचेवर चेहरा धुतल्यास चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य राखले जाते. उष्णता होत नाही व प्रदूषणाशी सामना करण्याची चेहेऱ्याची ताकद वाढते.
 • चेहऱ्यावरील तारुण्यपिटिका, डाग यावरील उपचार म्हणजे मंजिष्ठा, चंदन, लोध्र, वेखंड, मुलतानी माती यांचे समप्रमाणात मिश्रण चांगले घोटावे व ते चेहऱ्याच्या निगेसाठी रोज लावावे. सर्वत्र चेहऱ्याला व गळ्यालाही लावावे. डोळ्याभोवती फार जवळ लावू नये. ते सुकून कडकडीत होऊ देऊ नयेत. काढताना परत ओले करून अलगद काढावेत.
  वरीलप्रमाणे नियमितपणे कमीतकमी 3 महिने वापरल्यावरच परिणाम दिसू लागतात. त्याचबरोबर शरीरातील विकृतीवरही उपचार व आहारातील चुकांचे निवारण होणे आवश्‍यक आहे.

  इतर काही उपचार…
  – वरचेवर चेहऱ्याच्या त्वचेला हात लावणे, खरवडणे टाळावे.
 • झोपताना चेहरा स्वच्छ करून झोपण्याची सवय लावावी. मेकअपनंतर, प्रवासानंतर चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे असते.
 • कुठलेही प्रसाधन जाहिराती वाचून लावू नये. प्रथम मनगटाजवळ लावावे व 4-5 वेळा लावूनही दुष्परिणाम नसेल तर मग संपूर्ण चेहऱ्याला लावावे. विशेषत: बाजारात मिळणाऱ्या गोरेपणाच्या क्रीम्सने अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग आल्याचे दिसून येते.
  काही औषधोपचार चालू असतील तर त्याचेही दुष्परिणाम त्वचेवर दिसतात. त्वचेवर काही तक्रार उद्‌भवल्यास त्याआधीचे 3-4 आठवड्यांचे निरीक्षण करावे. आहारात, प्रसाधनात, सवयीत इतर औषधोपचारामुळे असे एखादे कारण आपलेच आपल्याला शोधून काढता येते.

  गौरवर्णासाठी वनौषधीचा उपचार
  आपल्याला जन्मजात एक प्रकारची त्वचा लाभलेली असते. वात पित्त कफ प्रकृतीनुसारही त्वचा बदलते. मूळचा रंग एकदम बदलणे अशक्‍य आहे. कधी कधी त्वचा उन्हामुळे, पोहोण्यामुळे, अशक्तपणामुळे, काही औषधांच्या सेवनामुळे, प्रदूषणामुळे, काही ऍलर्जिक रिऍक्‍शनमुळे, धुळीमुळे काळवंडते अशा वेळी तीन चार महिने वनौषधी चुर्णाने ब्लिचिंग करावे.

सौम्य ब्लीच चूर्ण घरच्या घरी करता येते. यामध्ये काकडी, पपई, हळद, चंदन, गुलाब, कडुनिंब, मुलतानी माती व काही सुगंधी द्रव्ये समप्रमाणात घेऊन ब्लिचिंग चूर्ण बनवता येते. जे आपल्या त्वचेचा पोत सुधारते त्यामुळेच त्चचेचा रंग उजळतो.

3 चमचे हे चूर्ण पाण्यात मिसळून पेस्ट करावी व चेहऱ्याला, गळ्याला, मानेला (डोळ्याभोवती सोडून) सर्वत्र लावावे. 20 मिनिटांनंतर चोळून धुऊन टाकावे. कधी कधी काही जणांना किंचित चुणचुणल्यासारखे होते; परंतु लगेचच ह्या संवेदना जातात. एक दिवसाआड किंवा रोजही हा पॅक लावता येतो. इतर काळजी म्हणजे उन्हापासून जपावे. छत्री वापरावी. बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला कोरफडजेल किंवा साजूक तुपाचा हात लावूनच बाहेर पडावे.

काकडी जेल हाही एक छान सौम्य ब्लीच आहे. ताज्या काकड्यांच्या गरापासून बनविलेला वापरायला व सुरक्षित असा हा जेल आहे. चेहऱ्याला सर्वत्र लावून 20 मिनिटांनंतर अलगद मळी काढून धुवावा.
कच्चा बटाटा किसूनही त्याचा लेप ठेवावा अथवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर पसरून 20 मिनिटं ठेवून चेहरा धुवावा. काही वेळा काकडी जेल किंवा कोरफडीच्या गरामुळे चेहऱ्याची आग होते व खाज सुटते पण घाबरून जाऊ नये. थोड्यावेळाने चेहऱ्याला थंड वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.