ये रे ये रे पावसा…(अग्रलेख)

शालेय पातळीवर प्राथमिक इयत्तांमध्ये मराठी विषयात नेहमीच “ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ ही कविता शिकवली जायची. विस्मरणात जाऊ लागलेल्या या कवितेची सध्या सर्वांनाच मनापासून आठवण येत असणार. तीव्र ऊन आणि टंचाईच्या झळा यामुळे तापलेल्या धरतीलाही “ये रे ये रे पावसा’ हे गाणे म्हणावे वाटत असेल इतकी भीषण स्थिती सध्या राज्यात आणि देशात आहे. जून सुरू झाला तरी लांबण्याची शक्‍यता असलेला पाऊस, भूगर्भातील पाण्याची कमी होणारी पातळी, धरणे आणि इतर जलाशयांमधील कमी होणारा पाणीसाठा पाहता लवकरच पाऊस झाला नाही, तर अत्यंत गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

भारतीय शेती आणि इतर सर्वच व्यवहार पावसाच्या पाण्यावरच बहुतांशी अवलंबून असल्याने देशातील नागरिकांनी चातकापेक्षा जास्त पावसाची वाट पाहिली नसती तरच नवल. मे महिना संपत आला की सर्वांनाच पावसाचे वेध लागतात. पाऊस कधी सुरू होईल, किती दिवस राहील, किती पाऊस पडेल याचे अंदाजही याच कालावधीत हवामान खात्याकडूनही जाहीर होत असतात. काही वर्षांपूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हमखास हजेरी लावायचा; पण गेल्या काही वर्षांत पावसाची ही हजेरी चुकत आहे. जून महिना संपतो तरी अनेकवेळा पाऊस सुरूच होत नाही. काही वर्षांपूर्वी भूगोलाच्या पुस्तकात चार महिना पावसाळा असतो, असे शिकवले जायचे; पण आता हे तथ्यही बदलून गेले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाचे अस्तित्व आता केवळ कागदावरच आहे.

एकतर पाऊस जून महिन्यात उशिरा सुरू होतो आणि तो सप्टेंबरपर्यंत लांबत नाही. त्यामुळे पावसाचा हंगाम आता जेमतेम 2 महिनेच असतो हे नवीन वास्तव स्वीकारावे लागेल. भारतासारख्या शेतीप्रधान पण पावसावर अवलंबून असलेल्या देशात पावसाचे किती महत्त्व आहे हे वेगळे सांगायला नको. येणाऱ्या वर्षांतील पाणीपुरवठा, वीजनिर्मिती, शेतीचे उत्पादन आणि अर्थव्यवस्था या साऱ्या गोष्टी फक्‍त पावसावरच अवलंबून असतात. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आणि यावर्षी पावसाचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज असल्याने या साऱ्या गोष्टीच विस्कळीत झाल्या आहेत. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती गेल्या आठवड्यापासून पूर्णपणे बंद झाली आहे.

105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात फक्‍त 16.51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून त्यातील 5 टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळेच कोयना जलविद्युत प्रकल्पातील चौथ्या टप्प्यातून निर्माण होणारी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम होऊन अर्थातच राज्याला काही प्रमाणात भारनियमनाचा फटका बसण्याची शक्‍यता आता गृहीतच धरावी लागेल. कोयना धरण हे एक उदाहरण आहे. कारण ताज्या आकडेवारीप्रमाणे राज्यातील सर्व धरणांमध्ये फक्‍त 7 टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. लोकांची पाण्याची गरज प्राधान्याने भागवताना जलसिंचन आणि वीजपुरवठा यासाठी हे पाणी कसे आणि किती वापरायचे हाच प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. सरकारी माहितीप्रमाणे राज्यात 2016 मध्ये पडलेल्या मोठ्या दुष्काळापेक्षाही यंदा भीषण स्थिती असून पाच हजारांहून अधिक गावांत तब्बल 6200 हून अधिक टॅंकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याची वेळ आली आहे.

गेल्या चार वर्षांच्या काळात राज्यात सुमारे 20-22 हजार गावांमध्ये महत्त्वाकांक्षी जलयुक्‍त शिवार योजनेची कामे होऊनही सुमारे पाच हजार गावे आणि 10 हजार 506 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यावर जलयुक्‍त शिवार योजनेची घोषणा करण्यात आली आणि पाच वर्षांत राज्य टॅंकरमुक्‍त होईल, असे दावे करण्यात आले होते. दरवर्षी पाच हजारांहून अधिक गावांमध्ये या योजनेची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आणि आतापर्यंत 20 ते 22 हजारांहून अधिक गावांमध्ये कामे पूर्ण झाली आहेत; पण तरीही हजारो गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे.

परतीचा पाऊस झाला नाही आणि प्रखर उन्हामुळे जलयुक्‍त शिवार योजनेतील कामांमधील पाणी आटले अशी कारणे देण्यात येत असली तरी त्याचीही तयारी सरकारने करायला हवी होती. राज्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार आणि यापुढे राज्याला दुष्काळाशी सामना करावा लागणार नाही. हा राज्यातील अखेरचा दुष्काळ असेल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यांनी जलयुक्‍त शिवाराची ही स्थिती समजून घ्यायला हवी. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक ये रे ये रे पावसा असा धावा करीत असेल तर आश्‍चर्य वाटण्याची गरज नाही. अर्थात पाऊस ही संपूर्ण निसर्गाची देणगी असल्याने त्याबाबत अन्य काहीच करता येत नाही.

सरकारने यावर्षी पुन्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची घोषणा केली असली तरी असे प्रयोग आतापर्यंत फारसे यशस्वी झालेले नाहीत आणि लाखो रुपये ढगात गेल्याचेच अनुभव सरकारच्या गाठीशी आहे. त्यामुळे दरवर्षीच जर असा दुष्काळ आणि पाणीटंचाईशी सामना करावा लागणार असेल तर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार होणार आहे की नाही, याचेच उत्तर आता शोधावे लागेल. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड आणि झपाट्याने उभी राहिलेली सिमेंटची जंगले याचा मोठा फटका निसर्गचक्राला बसला आणि पाऊसमान कमी झाले हे वास्तव सर्वांनाच माहीत आहे. पुढील पिढीचा विचार करून पर्यावरण जागृती केली जात असली आणि वृक्षारोपणाची मोहीम राबवली जात असली तरी सध्या काय करायचे हा सर्वात मोठा गहन प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर अवघड असल्याने सध्या तरी बालपणीची ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा ही कविता आळवून पावसाचा धावा करणे एवढेच आपल्या हातात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.