पृथ्वीच्या पाठीवर अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. त्याठिकाणी अतिशय विचित्र घटना घडतात. त्या का घडतात हे अद्यापही संशोधकांना समजलेले नाही. अशाच काही ठिकाणांविषयी…
गुरुत्वाकर्षण विरोध –
जम्मू-काश्मीरमधील लेह शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्यावर छोट्या परिसरात गुरुत्वाकर्षणाला विरोध जाणवतो. या डोंगराळ भागाला त्यामुळे गूढ टेकडी किंवा गुरुत्वाकर्षण टेकडी नावाने ओळखले जाते. हा सगळा प्रकार अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणाला भेट देत असतात. गुरुत्वाकर्षण विरोधी अनुभव येत असल्याने टेकडीच्या जवळील चढावरून जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या वरच्या दिशेने ओढल्या जात असल्याचा भास होतो. याचा परिणाम इतका आहे की, या परिसरातून जाणारी विमानेदेखील या भागात आल्यावर अधिक उंचीवरून प्रवास करतात.
लेक हिलियर, ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोल्डफिल्डस् एस्पेरान्स या भागातील एका मोठ्या बेटावरील तलावाचा परिसरही असाच गूढ आहे. या तलावातील पाण्याचा रंग गुलाबी असून ते काहीसे चिकटसर आहे आणि त्यातून बुडबुडे येत असतात. असे असले तरी या पाण्यात भरपूर मासे आहेत आणि हा तलाव पोहण्यासाठीदेखील सुरक्षित आहे. मात्र याठिकाणी पोहण्याची परवानगी नाही. या पाण्याच्या रंगामागील रहस्य इतके दिवस माहित नव्हते मात्र, आता संशोधकांनी या पाण्यातील अल्गी, हलोबॅक्टेरिया आणि अन्य सूक्ष्म जीवाणूंमुळे पाण्याला गुलाबी रंग आला असल्याचे शोधून काढले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या तलावातील पाणी खारट आहे.
सुसायडल फॉरेस्ट
जपानमधील प्रसिद्ध अशा फुजी पर्वताच्या पायथ्याशी आकीगाहारा नावाचे जंगल आहे. ते सुसायडल फॉरेस्ट या नावाने प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारांहून अधिक लोक याठिकाणी जाऊन आत्महत्या करतात. आधी स्थानिक लोक या जंगलाला झुकारी नावाने ओळखत असत. आता पोलिसांकडील नोंदीवरून याठिकाणी किती आत्महत्या होतात हे समजते. मात्र इथे सापडणाऱ्या मानवी सांगड्यांची संख्या कधीच जाहीर केली जात नाही. लोक इथे येऊन आत्महत्या का करतात, हे देखील गूढ आहे.
जपानमध्ये असे सांगण्यात येते की, प्राचीन काळी जेव्हा लोकांना स्वतःची देखभाल करणे अशक्य व्हायचे तेव्हा या जंगलात यायचे आणि भुकेने मरून जायचे. आता लोकांचा असा समज आहे की, या लोकांचे आत्मे इथेच घुटमळत असतात. तिथल्या ज्योतिषांचे असे मत आहे की, जंगलातील झाडांवर वास्तव्य असणाऱ्या या आत्म्यांमुळेच याठिकाणी विचित्र घटना घडतात. लोक एकदा का याठिकाणी आले की, इथल्या शक्ती त्यांना बाहेर पडू देत नाहीत आणि मग त्या व्यक्ती आत्महत्या करतात.
सर्पबेट, ब्राझील
ब्राझीलला लागून असलेल्या अटलांटिक सुमद्रात ल्हा दा क्विमादा नावाचे बेट आहे. त्याचे क्षेत्रफळ अगदीच कमी म्हणजे जेमतेम 43 हेक्टर एवढे आहे. ही जागाही अतिशय गूढ मानली जाते. या ठिकाणी विविध जातींचे लाखो विषारी साप आहेत. असे सांगितले जाते की, इथल्या सापाने माणसाला डंख केला तर तो 10 ते 15 मिनिटात मरण पावतो. आता या बेटावर जाण्यास ब्राझीलच्या नौदलाने बंदी घातली आहे.
भानगढ किल्ला –
राजस्थानातील अल्वर जिल्ह्यात सारिस्का राष्ट्रीय अभयारण्यात हा किल्ला आहे. हा किल्ला भूत किल्ला म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे. आमेरचा राजा भगवंत दास यांनी 1583 मध्ये हा जमिनीवरील किल्ला बांधला. असे सांगितले जाते की, ह्या ठिकाणी बालूनाथ योगी नावाचे तपस्वी तप करत असत. त्यांनी याठिकाणी किल्ला बांधण्यास परवानगी देताना असे सांगितले होते की, किल्ल्याची सावली माझ्या तपाच्या ठिकाणी पडता कामा नये. मात्र राजाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि एक दिवस किल्ल्याची सावली तपाच्या ठिकाणावर पडली. त्यावेळी बालूनाथ यांनी राजाला शाप दिल्याने त्याचे राज्य उध्वस्त झाले. असेही सांगितले जाते की, राजकुमारीच्या दासीने सांडलेल्या तेलामुळे एक दरड कोसळली आणि ती एका तांत्रिकाच्या दिशेने घरंगळत गेली. त्याचा त्याखाली सापडून मृत्यू झाला आणि त्याने दिलेल्या शापामुळे हे राज्य उध्वस्त झाले. त्यामुळे आता या किल्ल्यात पर्यटकांना सूर्यास्तानंतर जाऊ दिले जात नाही.
बर्मुडा त्रिकोण
हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे. या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा. अनेक जहाजे आणि विमाने आकस्मितरित्या बुडाली आहेत. अनेक दुर्घटनांना अवकाशातील घटक कारणीभूत असल्याचाही समज आहे. अमेरिकेच्या समुद्रकिनारपट्टी रक्षक दल आणि इतर संस्थांनी प्रचलीत समज चुकीचे आहेत असे सांगून बर्मुडा त्रिकोण मधील अपघात हे जगातील इतर अतिप्रवासाच्या भागापेक्षा जास्त नाहीत हे दर्शवणारी आकडेवारी दिली आहे. काही अपघातांची कारणे शोधण्यास यश मिळाले असले तरी, बऱ्याच अपघातांची कारणे अद्याप समजलेली नाहीत.