Cyclone News : समुद्रातील चक्रीवादळे ही वातावरणातील बदलांमुळे पाऊस आणि ढगांचा गडगडाट या स्वरूपात येतात. ही वादळे एखाद्या नरसाळ्याच्या किंवा भोवऱ्याच्या आकारात असतात आणि ती स्वतःभोवती अतिशय वेगाने फिरत असतात. समुद्रातून प्रवास करत ती किनाऱ्यावर धडकतात तर कधी आत खोलवर जातात किंवा किनारपट्टीवरून पुढे सरकत राहतात.
त्यामुळे अशी वादळे ज्या भागातून जातात तिथे अतोनात नुकसान होते. अशी चक्रीवादळे पृथ्वीच्या पाठीवर सगळीकडे कधी ना कधी अनुभवायला येत असली तरी अमेरिकेला अनेकदा त्याचा जोरदार फटका सहन करावा लागतो. अमेरिकेच्या मध्य, पश्चिम भागापासून ते बांगलादेशपर्यंत अशा चक्रीवादळाचा इतिहास.
१) वॅलेट्टा, माल्टा – १५५० – हे इतिहासातील ज्ञात असलेले युरोपातील सर्वात जुने चक्रीवादळ होय. त्याचा तडाखा भूमध्य समुद्रातील माल्टा नावाच्या बेटाला बसला होता. हे चक्रीवादळ सप्टेंबर 1551 किंवा 1556 मध्ये ग्रँड हार्बरवर धडकले होते. या वादळाच्या तडाख्यात सुमारे 600 लोक मरण पावले होते. या वादळाचे नामकरण वॅलेट्टा असे करण्यात आले असले तरी 1566 पर्यंत अशा प्रकारचे शहर अधिकृतरित्या कुठेही अस्तित्वात नव्हते.
२) उट्रेश्ट, नेदरलँड -1674 – हे अतिशय भयानक स्वरूपाचे चक्रीवादळ होते आणि नेदरलँड मधील अनेक प्रांतांना या वादळाचा तडाखा बसला होता. या वादळात किती जणांचा बळी गेला याच्या कुठेही नोंदी उपलब्ध नाही. मात्र त्यावेळी अनेकांच्या घरांची छपरे उडून गेली होती आणि चर्चचे मनोरे कोसळून पडले होते.
३) कोलकता, भारत – 1838 – 8 एप्रिल 838 रोजी भारताला नोंद असलेल्या पहिल्या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यामध्ये पूर्व कलकत्त्याचा बराचसा भाग या वादळाच्या कचाट्यात सापडला होता. सुमारे अडीच तास या वादळाने परिसरातील अनेक खेड्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. या वादळात सुमारे 215 जणांच्या बळी गेला होता.
४) नेटशेंग्ज, मिसीसीपी, अमेरिका –1840 या वादळाची देखील अधिकृत नोंदी उपलब्ध नाही. मात्र अंदाजानुसार असे सूचित करण्यात येते, की या वादळात सुमारे 317 जणांचा बळी गेला आणि शेकडो लोक जखमी झाले होते. या वादळात हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले होते.
५) सेंट लुईस, अमेरिका 1896 – 27 मे 1896 रोजी अमेरिकेतील सेंट लुईस शहराला चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला होता. अमेरिकेच्या इतिहासातील ते तिसऱ्या क्रमांकाचे भयानक वादळ ठरले. केवळ 30 मिनिटांच्या कालावधीत या वादळात शहरातील घरांची वाताहात झाली.
झाडे उन्मळून पडली. वाफेवर चालणाऱ्या बोटी वादळामुळे मिसीसीपी नदीच्या पात्रा बाहेर येऊन पडल्या. या वादळात 255 लोक मरण पावले तर शंभराहून अधिक जखमी झाले होते. हे वादळ ताशी 418 किलोमीटर वेगाने पुढे सरकत होते.
६) न्यु रिचमंड अमेरिका 1899 – न्यूरिचमंडच्या इतिहासातील हे अतिशय भयानक असे वादळ होते. या वादळात 117 जणांचा मृत्यू झाला, तर 300 हून अधिक इमारती कोसळून पडल्या. जवळपास नकाशावरून हे शहराचे अस्तित्व संपुष्टात आले होते.
७) मिसुरी, इलिनॉईस अमेरिका – 18 मार्च 1985 रोजी या वादळाने अमेरिकेतील तीन राज्यांना तडाखा दिला होता. या वादळाची सुरुवात मिसुरीपासून झाली नंतर ते इलिनॉईस आणि इंडियाना राज्यात पोहोचले.
या वादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले ते इलिनॉईस राज्याचे. या वादळात एकूण 695 लोक मरण पावले आणि दोन हजाराहून अधिक लोक जखमी झाले. सध्याच्या अमेरिकी डॉलरच्या हिशेबात बोलायचे तर त्यावेळी 296 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे नुकसान झाले होते.
८) जेम्स जॉर्जिया, अमेरिका 1936 – या वादळात 203 जणांचा मृत्यू झाला तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते. अतिशय भयानक अशा या चक्रीवादळात अनेक इमारती उध्वस्त झाल्या आणि झाडे उन्मळून पडली होती.