जगात स्मृती म्हणून जपल्या गेलेल्या कोणत्या वास्तु स्थळांना पर्यटक सर्वाधिक भेटी देतात. याविषयीचा अहवाल 2020-21 मध्ये तयार करण्यात आलेला होता.
१) नोत्र दॅम, पॅरिस – या यादीत पहिल्या क्रमांकावर पॅरिस मधील नोत्र दॅम कॅथेड्रल या कलात्मक वास्तूचा समावेश होतो. या ठिकाणी दरवर्षी सुमारे एक कोटी 20 लाख पर्यटक भेट देतात. अर्थात ही आकडेवारी एप्रिल 2019 पूर्वीची आहे. एप्रिल 2019 मध्ये या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आणि पर्यटकांच्या येण्यामध्ये अडथळे निर्माण झाले. अधिकृत आकडेवारीनुसार आग लागण्याच्या घटनेपूर्वी ही इमारत जगातील सर्वाधिक भेट देत असणारी इमारत म्हणून ओळखली जात होती. फ्रेंच गॉथिक शैलीत या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. 1345 मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर अनेक शतके उभ्या असलेल्या या इमारतीचे वास्तु सौंदर्य एक इंच देखील कमी झालेले नाही.
२) चीनची भिंत – ही भिंत जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानली जाते. पृथ्वीच्या पाठीवरील ही भिंत अंतराळातूनही दिसते. या ठिकाणाला दरवर्षी सुमारे 90 लाख पर्यटक भेट देतात. या भिंतीची लांबी 216 किलोमीटर असून ती बांधण्यासाठी 20 शतकांचा काळ जावा लागला. या इमारतीचे बांधकाम करताना सुमारे एक कोटी कामगारांचा मृत्यू झाला आणि त्यांचे दफन भिंतीच्या आसपास करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणाला जगातील सर्वात मोठी दफनभूमी म्हणूनही ओळखले जाते.
३) सिडने ऑपेरा हाऊस, ऑस्ट्रेलिया – सिडनेमधील द ऑपेरा हाऊस ला दरवर्षी सुमारे 75 लाख पर्यटक भेट देतात या ऑपेरा हाऊसचे बांधकाम 1957 साली सुरू झाले आणि 1973 साली पूर्ण झाले. त्यासाठी सुमारे दहा कोटी वीस लाख डॉलर खर्च आला. या इमारतीच्या बांधकामांसाठी दहा हजार कामगार काम करत होते. सिडने ऑपेरा हाऊसला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी वर्षभरात सुमारे 3000 कार्यक्रम होतात. त्यामध्ये नाटके, संगीताचे कार्यक्रम, चित्रपट यांचा समावेश असतो.
४) आयफेल टॉवर, फ्रान्स – आयफेल टॉवरला दरवर्षी 67 लाख पर्यटक भेट देतात. जगातील सर्वाधिक पर्यटक भेट देत असणाऱ्या स्थळांच्या यादीत आयफेल टॉवर हे चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रेंच क्रांतीच्या शंभराव्या स्मृतीनिमित्त आयफेल टॉवरची उभारणी करण्यात आलेली आहे. या टॉवरचे डिझाईन गुस्ताव आयफेल यांनी 1889 मध्ये पॅरिस मधील युनिव्हर्सल एक्जीबिशन मध्ये सादर केले होते.
५) लिंकन मेमोरियल, वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेतील द लिंकन मेमोरियल हा वॉशिंग्टन मधील मॉल असून अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन तसेच एकंदरीत स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणाला दरवर्षी साठ लाख पर्यटक भेट देतात. या स्मृतीस्थळाचा वास्तू आराखडा हेन्री डेक्कन आणि डॅनियल चेस्टर यांनी तयार केलेला आहे. या स्मृतीस्थळात अब्राहम लिंकन यांचा अतिशय देखणा असा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या शेजारीच त्यांचे गेटसबर्ग येथील प्रसिद्ध भाषण शिल्पावर कोरून ठेवण्यात आलेले आहे.
६) स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, न्यूयॉर्क – या पुतळ्याची उभारणी 1886 मध्ये करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक स्मारक म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. या पुतळ्याचे मूळचे नाव लिबर्टी एनलाईटनिंग द वर्ल्ड असे होते. या ठिकाणाला दरवर्षी 43 लाख पर्यटक भेट देतात. हा पुतळा फ्रान्सने अमेरिकेला भेट म्हणून दिलेला आहे. या पुतळ्याचा आराखडा फ्रेडरिक बार्थ होल्डी यांनी तर अंतर्गत रचना गुस्ताव आयफेल यांनी केलेली आहे.
७) पिरॅमिड्स, कैरो इजिप्त – गिजा येथील सर्वात मोठा पिरॅमिड हा सर्वात जुना असून जगातील सात आश्चर्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. प्राचीन इजिप्त मधील द फराह शेऑप्स या घराण्यातील चौथ्या पिढीने पिरॅमिडच्या उभारणीच्या आदेश दिला होता. ख्रिस्त पूर्व 2570 मध्ये हे स्मारक पूर्ण झाले. या ठिकाणाला दरवर्षी 30 लाख पर्यटक भेट देतात.
८) ताजमहाल, आग्रा – मुघल सम्राट शहाजानने आग्रा येथे ताजमहालची उभारणी केली. शहाजानची पत्नी अर्जुमंद बानू बेगम हिच्या स्मरणार्थ त्याने ताजमहाल बांधला. या बेगमचे निधन चौदाव्या अपत्याला जन्म देताना झाले होते. या ठिकाणाला दरवर्षी 25 लाख पर्यटक भेट देतात. संगमरवरामध्ये उभारण्यात आलेला या वास्तूच्या उभारणीसाठी 20000 कामगार, शेकडो हत्ती यांचा वापर करण्यात आला होता. या वास्तूची रचना शहाजानच्या दरबारातील वास्तु विशारद उस्ताद अहमद लाहोरी यांनी केली होती.