नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचा जोरदार विस्तार सुरु असून आज राज्यातील 12 टीव्ही व सिनेकलाकारांनी भाजपमध्येप्रवेश केला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री पर्णो मित्रा हिने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना घोष यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि त्यांचा विकासाचा अजेंडा पाहून राज्यातील जनतेला प्रेरणा भेटत आहे.” असं वक्तव्य केलं. यावेळी ऋषी कौशिक, कांचन मोइत्रा, रुपंजना मित्रा आणि विश्वजित गांगुली यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकांतील पश्चिम बंगाल येथील भाजपच्या कामगिरीनंतर राज्यात भाजप प्रवेशाचे वारे सुरु झाले असून तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व सीपीएम या पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.