…म्हणून ‘कर्मयोगी’ची निवडणुक लढवणार नाही – राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

बिजवडी – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याची उत्सुकता शेतकरी वर्गाला व सभासदांना लागली होती. मात्र या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

कारखाना निवडणूक लढवून जिंकून जरी आणला तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल अशी स्थिती सध्या कारखान्याची दिसत नाही. सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव असणारी खूप मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. परंतु अशा योग्य व चांगल्या लोकांचे जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून उमेदवारीपासून कायदेशिररित्या दूर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे आम्हाला योग्य वाटत नाही.

साखर कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधन आहे. तसेच कारखान्याची परिस्थिती ज्यांनी बिकट केली आहे. त्यांनीच या कारखान्याची अर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकन्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना नफ्यात आणणे गरजेचे आहे.असे आम्हाला वाटते.

म्हणून याचा विचार करून सदर निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:चे पॅनल उभे करणार नाही असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी गुरुवार दि.23 सप्टेंबर रोजी दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.