वाकोडी येथे कत्तलखाना होऊ देणार नाही

सुभाष मुथा यांचा इशारा : 16 एप्रिलला धरणे-रस्ता रोको

नगर – नियोजित वाकोडी कत्तलखान्याचा हट्ट महानगरपालिकेने सोडला नाही तर मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी धरणे आंदोलनासह रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिला आहे. मुथा यांनी वाकोडी कत्तलखान्या विरोधात संपूर्ण जैन समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून, संपूर्ण वाकोडी गावाचाही या कत्तलखान्याला विरोध आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी हा कत्तलखाना होणार नाही, असे आश्‍वासन दिल्यानंतरही प्रशासनाने कत्तलखाना उभारणीची तयारी सुरु केली आहे. मनपाच्या या हटवादीपणा विरोधात धरणे आंदोलन, उपोषणासह प्रसंगी आत्मदहनाचा मार्ग स्विकारु असा इशाराही सुभाष मुथा यांनी दिला आहे.

वाकोडी ग्रामपंचायत आणि नगर परिसरातील नागरिकांनी मनपाला ठराव दिला आहे. जैन समाजाने मनपा, खा.दिलीप गांधी, आ.संग्राम जगताप, आ.अरुण जगताप, आ.शिवाजीराव कर्डिले, शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड अशा सर्व पक्षीय नेत्यांना आनंदधाम जवळच सारसनगर रस्त्यावर होणारा कत्तलखाना होऊ नये अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. पुज्य साध्वी प्रीतीसुधाजी तसेच साध्वी रत्नाकिरणप्रभाजी महाराजांनी हजारो निष्पाप पशुंचा बळी घेणारा कत्तलखाना या परिसरात नको, अशी विनंती केली होती. महापौरांनी तसे आश्‍वासनही दिले, मात्र आश्‍वासनाला हरताळ फासून मनपा प्रशासनाने महानगरपालिकेने हा प्रकार न थांबवल्यास मनपा विरुद्ध तीव्र आंदोलनासह उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सांगितले. मनपात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापौर वाकळे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळास आणि वाकोडी ग्रामस्थांना हा प्रकल्प होणार नाही, साध्वी प्रीतीसुधाजी महाराज, साध्वी रत्नाकिरणप्रभाजी महाराज व इतर साधू भगवंत आणि नागरिकांच्या तीव्र भावनांचा मनपा गांभिर्याने विचार करत असल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेना नेते अनिल राठोड यांनी जैन समाज आणि पुज्य साध्वीजी प्रीतीसुधाजी यांना आपण हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे समक्ष भेटून लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र असे असतांना मनपा आरोग्य विभागाने आचार संहिता काळातच या प्रकल्पासाठी ऑनलाईन निविदा मागवल्या अल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरुन समजले आहे. मनपात विचारणा केली असता आरोग्य विभागातून लवकरच निविदाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थ आणि जैन समाजाच्या भावनांशी खेळणाचा हा प्रकार न थांबवल्यास वाकोडी ग्रामस्थ आणि जैन समाज सर्व मार्गाने मनपा विरुद्ध दि. 16 एप्रिल पासून आंदोलन उभारणार असल्याचा इशारा मुथा यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.