चेन्नई : तामिळनाडूत गतवर्षी आम्ही भाजपशी असणारी युती तोडली. त्या पक्षाशी आज, उद्या आणि यापुढे पुन्हा कधीच युती होणार नाही, अशी ठाम भूमिका त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकने सोमवारी मांडली. तामीळनाडूत अण्णाद्रमुक आणि भाजप या पक्षांनी हातमिळवणी केली होती. त्या पक्षांनी २०१९ या वर्षातील लोकसभा निवडणूक आणि २०२१ मधील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली. पण, त्या पक्षांच्या पदरी पीछेहाट आली.
त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये अण्णाद्रमुकने भाजपबरोबरची मैत्री संपुष्टात आणली. तामिळनाडूत पुढील विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये होईल. मात्र, आतापासूनच त्या निवडणुकीविषयीची चर्चा सुरू झाली आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीविरोधात लढण्यासाठी अण्णाद्रमुक आणि भाजप पुन्हा एकत्र येतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत.
त्याविषयी अण्णाद्रमुकचे प्रमुख के.पलानीस्वामी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केलेली टिप्पणी संभ्रम वाढवणारी ठरली. राजकीय स्थितीचा विचार करून निवडणुकीआधी युती-आघाड्यांची सथापना होते. त्याविषयी आधीच भाकीत करता येऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे भाजपशी पुन्हा जुळवून घेण्यास अण्णाद्रमुकची ना नसल्याचे चित्र निर्माण झाले.
त्यावर अण्णाद्रमुकच्या गोटातून स्पष्टीकरण देण्यात आले. भाजपशी पुन्हा युती करण्याचा प्रश्नच नसल्याचे आम्ही याआधीच स्पष्ट केले आहे. केंद्रीय निधीची उपलब्धता, कावेरी नदीतून पाणीपुरवठा या मुद्द्यांवर भाजपने तामिळनाडूचा विश्वासघात केला. ती स्थिती कायम राहिल्यास भाजपला तामीळनाडूतील जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, अशी आक्रमक भूमिका अण्णाद्रमुकने मांडली. त्यामुळे भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मुडमध्ये तो पक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.