झारखंड – शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 व्या वर्गातील विद्यार्थांना परीक्षेसाठी प्रॅक्टिकलमध्ये नंबर दिले नाही, यामुळे 11 विद्यार्थ्यांना डी ग्रेड मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील दुमका जिल्ह्यात गोपीकंदर अनुसूचित जमाती निवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक शिक्षक कुमार सुमन आणि लिपिक सोनराम चाडे यांना आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केली. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले यानंतर कुमार सुमन यांनी गोपीकंदर येथे जाऊन उपचार केले. या घटनेचा व्हिडिओ स्वःताहा विद्यार्थ्यांनी शूट करत सोशलवर शेअर केला आहे.
घटनेची माहिती मिळताच बीडीओ अनंत कुमार झा, स्टेशन प्रभारी नित्यानंद भोक्ता आणि बीईईओ सुरेंद्र हेमब्रम शाळेत पोहोचले. याबाबत त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक रामदेव प्रसाद केशरी व इतर शिक्षकांना विचारणा केली. त्यानंतर विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली. प्रॅक्टिकलमध्ये गुण देण्यात आले नाहीत, त्यामुळे ते नापास झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
9वीच्या विद्यार्थ्यांनी पुढे सांगितले की, ’36 विद्यार्थ्यांनी 9वीची परीक्षा दिली होती. शनिवारी निकाल लागला, त्यात 11 विद्यार्थ्यांना दोन विषयात डी श्रेणी मिळाली. विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेचे मुख्याध्यापक रामदेव प्रसाद केशरी यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, शिक्षक कुमार सुमन यांनी क्रमांक दिले आहेत. त्यानंतर विद्यार्थी शिक्षक कुमार सुमन यांच्याकडे गेले. याबाबत ते शिक्षकांशी बोलले, यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर विद्यार्थ्यानी लिपिक सोनेराम चाद्रे यांची भेट घेतली. त्यांनी कोणतेही पेपर दाखवण्यास स्पष्टपणे नकार दिला, त्यानंतर विद्यार्थ्यांची संतापले आणि विद्यार्थ्यांनी कुमार सुमन व लिपिक सोनेराम चोडे यांना शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाला बांधून बेदम मारहाण केली.’
शिक्षक कुमार सुमन यांनी गोपीकंदर सीएचसी रुग्णालय गाठून उपचार केले. कुमार सुमन हे शाळेत तत्काळ सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 5 एप्रिल 2022 रोजी सुमन यांना शिक्षक पदावरून काढून टाकण्यात आले. कुमार सुमन यांच्या विरोधात शाळेतील विद्यार्थ्यांनी गोपीकंदर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि योग्य वेळी जेवण न दिल्याचा आरोप करत अर्ज सादर केला होता. कुमार सुमन याच्याविरुद्धही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.