सासवड, (प्रतिनिधी) – शासनाच्या माध्यमातून करोडो रुपयांचा खर्च करून जलजीवन मिशन योजनेची कामे ठेकेदार आणि अधिका-यांच्या संगनमताने आणि राजकारणामूळे कामे अर्धवट आहेत. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने ही कामे अत्यंत पारदर्शी व्हावीत.
ठेकेदार पोसण्यासाठी ही योजना नाही याकडे अधिका-यांनी गांभीर्याने घ्यावे. ठेकेदारांना पाठिशी घालू नये., जलजीवन योजनेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही,असा सज्जड इशारा देत आमदार संजय जगताप यांनी येत्या अधिवेशनात प्रश्न मांडून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सोमवारी (दि. 24) तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांच्यात समन्वय बैठक झाली. यामध्ये जनतेतून प्रश्नांचा पाऊस पडला.
याप्रसंगी तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, महावितरणचे अधिकारी अरविंद वनमोरे, बांधकाम विभागाच्या अधिकारी स्वाती दहिवाल,
सुदामराव इंगळे, नंदूकाका जगताप, प्रदीप पोमन, माणिकराव झेंडे, विठ्ठलराव मोकाशी, सुनिता कोलते, अॅड गौरी कुंजीर, विष्णू भोसले, संदेश पवार, सोमनाथ कणसे, यांसह पाणी पुरवठा, एस टी आगार, भूमि अभिलेख, विविध गावांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद आणि समन्वयातून पुरंदरच्या तळातील घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्यास मदत होईल.
त्यामुळे यापुढील काळात शासनाच्या खात्यांत एकमेकांत आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवाद व समन्वय राहील याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. तसेच येत्या 24 जुलै रोजी आमसभा होणार असून त्यत्पूर्वी प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबबत प्रश्नांचा पाऊस
जनजीवन मिशन, पाणीपुरवठा विभाग, पानंद रस्ते, स्थानिक पातळीवर महसूल विभागाचे कर्मचारी, महावितरण, वाळू आणि मातीउपसा, एसटी बस आगार, भूमि अभिलेख, पालखी महामार्ग, अंतर्गत रस्ते, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंतप्रधान सडकचे रस्ते, वतनी जमीनींचे प्रश्न, वासरनोंदी आदी कामांबाबत नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
.तर बीएलओंनी जागा मोकळी करावी
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे आढळले. याबाबत बहुतांश बीएलओ काम करीत नसल्याबाबत निदर्शनास आले आहे. अशा बीएलओंनी काम करता येत नसेल तर जागा मोकळी करावी. तसेच मतदारांच्या परीसरातच मतदान केंद्र त्या-त्या ठिकाणी असावीत., याकडे संबंधीतांनी लक्ष द्यावे असेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.