शहरात सराव सुरू, पारंपरिकतेबरोबरच नवीन प्रयोगांना देखील मिळणार चालना
पारंपारिक पोषाख, लयबध्द हालचाली मिरवणुकीची शोभा वाढवितातढोलपथकांनाही राजकारणाचे ग्रहण
नगरमध्ये ढोलपथकांची संख्या दरवर्षी वाढत असून या चांगल्या चळवळीलाही राजकारणाचे ग्रहणाने ग्रासायला सुरवात केली आहे.सदस्य पळविण्या पासून ते अन्य गोष्टींपर्यंत सर्व बाबींत शिरू पहात आहे. गेल्या काही वर्षात चांगले बळ धरू पाहणारी ही चळवळ राजकारणाच्या शिरकावाने नेस्तनाबूत होण्याची भिती निर्माण झाली आहे.
नगर – गल्लोगल्ली कानी पडणारे ढोल ताशांचे निनाद गणेशोत्सवाची चाहुल घेवून येतात.यंदाही गणेशोत्सवाच्या काळात ढोल-ताशांचाच बोलबाला राहणार असल्याचे चित्र सध्या शहरातील एकंदरीत वातावरणावरून दिसत आहे.सीडी, डीजे नियमांच्या कचाट्यात अडकल्याने ढोलपथकांना सुगीचे दिवस आले आहेत.त्यामुळे ढोलपथकांची सदस्य नोंदणी, सराव यांनी गणेशोत्सवाचा माहोल तयार व्हायला सुरवात झाली आहे. नगर शहरात साधारणतः नऊ ते 10 ढोल पथके आहेत.
साधारणपणे रोज संध्याकाळी सराव सुरू होताच ढोलताशांचे निनाद कानी पडू लागतात .त्या लयबद्ध तालाचा आवाज कानात रुंजी घालायला लागतो.
मग त्यात कधी नाशिक ढोलचे तर कधी पुणेरी ढोलचे ताल कानी पडू लागतात. यापारंपारिक तालांबरोबरच काही पथके प्रयोगातून नवा ताल बसवितात.त्यातून कशी शिवस्तुती,तर कधी वक्रतुंड महाकाय, तर कधी भीमरुपीचे वादन ऐकायला मिळते. मिरवणुकिच्या वेळी या पथकांचे पारंपारिक पोषाख,त्यांच्या लयबद्ध हालचाली, पथकातील झेंड्यांचे तालबद्ध नर्तन सगळ्याच गोष्टी मनाला भुरळ घालणाऱ्या,नागरिकांच्या लक्ष वेधणाऱ्या ठरतात.
रुद्रनादचे अवधूत गुरव यांच्या मते ढोलपथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सदस्य नोंदणी कमी होत असल्याचे सांगण्यात येते त्यातही नविन स्थापन होणाऱ्या ढोलपथकात सदस्यांची वाटणी होत असल्याने सदस्य नोंदणीवर त्याचा परिणाम दिसून येतो. सध्या त्यांच्या ढोलपथकात 100 मुलामुलींनी सदस्य नोंदणी केली असून यात नव्याने दाखल होणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असल्याचे जाणवतेय.यात 60 ढोलवाले, 20 ताशेवाले15 ध्वजधारी,1 टोल, 16 झांजवाले अशी विभागणी करण्यात आली आहे.सध्या त्यांनी पारंपारिक तालांचा सराव सुरूकेला असून दोन तीन दिवसांत नविन तालांचा सराव सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
आम्ही नगरकर या पथकाने 120 सदस्यांची नोंदणी केली असून त्यात 40 ढोलवाले,10 ताशे,15 ध्वजधारी ,1 टोल असा त्यांच्या ढोलपथकाचा ताफा असून गुरूदत्त लॉन येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळात त्यांचा सराव सुरू असतो. तालयोगी या ढोलपथकांत 180 सदस्यांचा ताफा असून त्यात 80 ढोल ,30 ताशे,15 ते 20 ध्वजधारी, 1टोल अशी विभागणी असून नाशिक ,पुणेरीढोलच्या तालाबरोबरच नव्या नगरी तालाचा सराव सध्या सुरू आहे.
शिवाय इकोफ्रेंडली गणपतीचा प्रचार आणि अनंत चतुर्थीच्या दिवशीची एकत्रितरित्या गणपतीची मिरवणुक ही या पथकाची वैशिष्ट्ये आहेत. या उपक्रमाचे हे 5वे वर्ष आहे असे तालयोगी पथकाचे तन्मय घोडके यांनी सांगितले. कपिलेश्वर ढोलपथकात यंदा 83 सदस्यांनी नोंदणी केली असून त्यात 50 ढोल ,20 ताशे, 3 ध्वज,1 टोल अशी या पथकाची मांडणी आहे.कपिलेश्वर मित्र मंडळ या सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून चालविले जाणारे हे एकमेव पथक आहे. यासर्व ढोल पथकांची मिरवणुकीसाठी किंवा स्थिरवादनासाठी निवड केली जाते. एकुणच यंदाही गणेशोत्सवात याच सर्व ढोलपथकांचा बोलबाला राहणार हे नक्की.