जायकाचे अधिकारी येणार पुण्यात
पुणे – जायका कंपनीच्या सहकार्यातून करण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाच्या वाढीव दराने आलेल्या निविदांवर चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी अर्थात 19 तारखेला “राष्ट्रीय जलशक्ती’ विभागाचे अधिकारी पुण्यात येणार आहेत. सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या निविदा अधिक दराने का भरल्या गेल्या या अनुषंगाने संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून स्पष्टीकरण घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील मुळा-मुठा नदी स्वच्छता उपक्रमांतर्गत शहरात होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी नदी काठांवर 11 ठिकाणी मैलापाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. जपानच्या जायका कंपनीने यासाठी 850 कोटी कर्ज नाममात्र व्याजदराने केंद्र सरकारला उपलब्ध करून दिले असून, केंद्र अनुदान स्वरूपात ही रक्कम महापालिकेला देणार आहे.
या प्रकल्पासाठीचा 15 टक्के खर्च महापालिका करणार असून, 6 टप्प्यांत हे काम होणार आहे. यापैकी 4 टप्प्यांच्या 450 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदा तब्बल 50 ते 75 टक्के अधिक दराने आल्याने महापालिका प्रशासन चक्रावून गेले आहे.
वाढीव दराने आलेल्या निविदा स्वीकारणे योग्य होणार नसल्याचे मत महापालिकेने राष्ट्रीय जलशक्ती विभागाला कळविले आहे. तसेच, या निविदा स्वीकारल्यास वाढणाऱ्या खर्चाचे दायित्व कसे उभारणार? याबाबत मार्गदर्शन करण्याविषयीचीही विनंती केली आहे.
यासंदर्भात मंगळवारी दिल्ली येथे राष्ट्रीय जलशक्ती विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात बैठक झाली. याला महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी येत्या 19 तारखेला पुण्यामध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसह वाढीव दरांबाबत चर्चा करण्यात येईल, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सचिवांनी सांगितल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.
“एचसीएमटीआर’च्या बाबतही लवकरच निर्णय
“एचसीएमटीआर’ या शहरांतर्गत वर्तुळ मार्गाच्या निविदाही 44 टक्के अधिक दराने आल्या आहेत. महापालिकास्तरावर समिती स्थापन करून या निविदांची तांत्रिक तपासणी सुरू आहे. या समितीच्या दोन बैठका झाल्या असून, निविदा भरणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बोलवून अधिक दर भरल्याबाबत स्पष्टीकरण घेण्यात आले आहे. यासंदर्भात पुढील काही दिवसांत शेवटची बैठक होईल. त्यामध्ये “एचसीएमटीआर’च्या निविदा स्वीकारायच्या की फेरनिविदा काढायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी दिली.