कटऑफच्या निकषावरून अकरावीच्या वाढीव जागा मिळणार

पुणे – गतवर्षी कनिष्ठ महाविद्यालयांचा दुसऱ्या प्रवेश फेरीत कटऑफ 85 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. त्याच महाविद्यालयांना दहा टक्‍के जागा वाढवून दिल्या जाणार आहेत. या निकषास पात्र असलेल्या जवळपास 20 कनिष्ठ महाविद्यालयांच्या दहा टक्‍के जागा वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विज्ञान महाविद्यालयात 5 टक्‍के,तर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात 10 टक्‍के जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे, नागपूरमधील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या सरसकट सर्व शाखांच्या 10 टक्‍के जागा वाढवून दिल्या जाणार आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार पुण्यातही अकरावी प्रवेशाच्या जागा वाढवून मिळणार आहेत.

कोट्याचा संभ्रम राहणार नाही
दहा टक्‍के जागा वाढवून दिल्या जातील. एकूण प्रवेश क्षमतेच्या दहा टक्‍के जागा अधिक उपलब्ध होतील. दहा टक्‍कांप्रमाणे व्यवस्थापन कोटा 5 टक्‍के, इनहाऊस कोटा 10 टक्‍के अशा पद्धतीने सर्व कोट्यातील प्रवेश होतील. वाढीव जागांमध्ये कोट्यातील प्रवेशावरून कोणताही संभ्रम राहणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

सरेंडर प्रवेशाची माहिती दर्शनी भागात लावा
संस्थांना त्यांच्या व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत प्रत्याप्रित (सरेंडर) करावयाचे आहेत, त्याबाबत संस्थांना पत्र पाठविण्यात येत आहे. ज्या संस्थांनी त्यांच्या कोट्यातील प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत वर्ग करणार आहेत, त्या संस्थांनी त्याची माहिती महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर दर्शनी भागात लावावी. त्यामुळे व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देऊ, असे सांगून फसवणूक प्रकार होणार नाही.

85 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कटऑफ असणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या मागणीनुसार जागा वाढवून दिल्या जातील. 20 महाविद्यालयांना जागा वाढवून मिळण्यासंदर्भाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर प्रवेशाची क्षमता वाढविण्यास मुभा दिली जाईल. सुमारे 1400 जागा वाढतील.
– मीनाक्षी राऊत, उपसंचालक, शिक्षण विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)