लंडन – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे. या सामन्यात सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून अनेक चाहत्यांनी तिकीट नसतानाही मैदानात घुसखोरी केल्याचे समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
इंग्लंडच्या चाहत्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडून वेम्बली स्टेडियममध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबतची सर्व चौकशी करण्याचे आदेश युरोपियन फुटबॉल महासंघाने दिले आहेत.
या सामन्यात 1-1 अशा बरोबरीनंतर इंग्लंडचा संघ इटलीविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाला. त्यानंतर स्टेडियमच्या बाहेर आले असताना दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी घडली. याबाबत इंग्लंड फुटबॉल संघटनेवर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या सामन्यासाठी उपस्थित असलेले सुरक्षा अधिकारीही टीकेचे लक्ष्य बनले असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
उपांत्य सामन्यातील चाहत्यांच्या गैरप्रकारामुळे इंग्लिश संघटनेला 35 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, यातून कोणताही बोध न घेता पुन्हा एकदा अशीच घटना अंतिम सामन्यानंतरही घडल्याने आता सर्वबाजूने इंग्लंड संघटनेवर टीका होऊ लागली आहे.