राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये “खांदे’पालट होणार

शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही स्थानिक पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्याचा निर्णय घेतल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. आक्रमकपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह महिला अध्यक्षा व युवक अध्यक्षांचे राजीनामे घेतले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत असून त्यासाठी प्रभागरचना प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सन 2017 पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सलग पंधरा वर्षे सत्ता होती. मात्र मोदी लाट आणि सत्तेच्या विरोधात निर्माण झालेला जनप्रवाह यामुळे गतवेळी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महापालिकेत मोठा विजय मिळवित एकहाती सत्ता स्थापन केली होती. पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीसाठीही भाजपाने जोरदार तयारी चालविली असताना अद्यापपर्यंत राष्ट्रवादीच्या पातळीवर शांतता दिसून येत होती. मात्र आता राष्ट्रवादीनेही आक्रमक भूमिका घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

जानेवारी महिन्यात निवडणुकीचे बिगुल वाजणार असले तरी भाजपला शह देऊन महापालिकेच्या सत्तेत परतण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्याचे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रदेश पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आक्रमक व्यूहरचना करण्याच्या उद्देशाने शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर व युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांचे राजीनामे घेतले जाणार असून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

शहराध्यक्षपदासाठी स्पर्धा
पडत्या काळात राष्ट्रवादीची धुरा जोमाने सांभाळणाऱ्या व इतरांच्या तुलनेत अत्यंत सौम्य स्वभावाचे मानले जाणाऱ्या संजोग वाघेरे यांना पक्षातील वरिष्ठ पद दिले जाणार असून त्यांच्या जागी भोसरीतून शहराध्यक्ष दिला जाण्याची शक्‍यता आहे. महिला शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप निश्‍चित झाले नसले तरी युवकच्या शहराध्यक्षपदी मात्र आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांची नियुक्ती निश्‍चित मानली जात आहे. तर निवडणूक प्रमुख तसेच कार्याध्यक्ष या पदांबाबतही खल सुरू असून या पदांवरही निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

नव्या चेहऱ्यांची शुक्रवारी घोषणा?
सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना उद्या (गुरुवारी) राजीनामे सादर करण्याबाबत सांगण्यात आले असून नव्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे करणार असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.