खेळत्या भांडवलासाठी लवकर कर्जासाठी होणार उपयोग : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
देशात जिल्हा, तालुका पातळीवर छोटे उद्योग निर्माण होण्याची गरज
पुणे – बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना छोट्या उद्योगांना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी छोट्या उद्योगाकरिता पतमानांकन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
छोट्या उद्योगांना कर्जपुरवठा करण्याबाबत बॅंका आणि वित्त संस्थांनाही अनेकदा अडचणी येतात. कारण या उद्योगांना कर्जपुरवठा करताना अनेक वेळा खर्चाचा वापर व परतफेडीचे तपशिलात रेकॉर्ड उपलब्ध नसते. नव्या व्यवस्थेत डिजिटल डेटा बेस क्रेडिट रेटिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे कुटीर, छोट्या आणि मध्यम उद्योगांना या डिजिटल डेटा बेस क्रेडिट रेटिंगच्या आधारावर वेळोवेळी खेळत्या भांडवलासाठी पुरेसा कर्जपुरवठा होऊ शकेल.
लघू उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याचा तपशील देताना सांगितले की, भारतातील रोजगार निर्मितीचा प्रश्न सोडविण्याची क्षमता छोट्या उद्योगात आहे. कारण मोठे उद्योग शहरात केंद्रित झालेले आहेत. मात्र भारतामध्ये जिल्हा, तालुका पातळीवर छोटे उद्योग निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी शेती आधारित उद्योगाची मदत होऊ शकते. मात्र या उद्योगांना भांडवल उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून डिजिटल डेटा बेस क्रेडिट रेटिंग ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी लघुउद्योग मंत्रालय प्रयत्न करीत आहे. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नात आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासह निर्यातीमध्ये लघू उद्योगाचा वाटा मोठा असूनही या उद्योगाला पुरेसा भांडवल पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रेडिट रेटिंगमध्ये काय असेल
एखाद्या उद्योगाने बॅंका, बिगर बॅंक वित्तीय संस्थाकडून घेतलेले कर्ज, कर्जाची केलेली परतफेड त्याचबरोबर या उद्योगांनी राज्याचे व केंद्र सरकारचे भरलेले कर यासंबंधातील तपशिलात माहिती या पतमानांकन व्यवस्थेत असणार आहे. त्यामुळे या उद्योगाची एकूण वाटचाल कशी आहे आणि भविष्यात या उद्योगाला कर्ज दिल्यास त्याची परतफेड होऊ शकेल का याचा अंदाज बॅंकांना येऊ शकेल.