शहरातील वाहतूक कोंडीवरील उपाय : गुरुवारपासून व्यवस्था प्रत्यक्षात येणार अंमलात
पुणे – शहरातील प्रमुख 11 रस्ते “फ्रीवे’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे रस्ते पार्किंग आणि अतिक्रमण विरहित असणार आहेत. जेणे करून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. गुरुवारपासून ही व्यवस्था प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापालिका आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यासाठी शहरातील प्रमुख 11 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांवर वाहतूक अडथळा विरहित आणि जलद करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील फर्गसन रस्ता, सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता आदी रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.
या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहेत. तसेच, यावर कोणत्याही प्रकारचे पार्किंग नसणार आहे. यासंदर्भात बुधवारी आणखी एक बैठक होणार असून, गुरुवारपासून प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे शहरात करण्यात येणाऱ्या अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी यापुढे प्राधान्याने पोलीस संरक्षण देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.