शेतीसाठी आता दिवसाही वीज मिळणार

वाघाळेतील माजी सरपंचांच्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी यश

रांजणगाव गणपती – वाघाळेसह (ता. शिरूर) परिसरामध्ये सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला असून रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाणे कठीण झालेले आहे; मात्र शेतीसाठी असणारा वीजपुरवठा दिवसा बंद ठेवून रात्रीच्या वेळी सुरू ठेवला जात असल्यामुळे शेतीचा वीजपुरवठा दिवसा सुरू ठेवावा यासाठी माजी सरपंचांसह काही शेतकरी तीन दिवसांपसून उपोषणास बसलेले असताना आठवड्यातून तीन दिवस रात्री व चार दिवस दिवसा वीजपुरवठा देण्यात येईल, असा तोडगा निघाला आहे.

शिरूर तालुक्‍यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याच्या भीतीने नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत, अशातच शेतकऱ्यांच्या शेती पंपाला रात्री दहा तास वीज मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव रात्री शेतात पाणी भरण्यासाठी आपला जीव मुठीत धरून जात आहे, त्यामुळे वाघाळे गावचे माजी सरपंच व शेतकरी पप्पू भोसले यांच्यासह काही शेतकरी आक्रमक झाले असून या शेतकऱ्यांनी आता शेतीपंपाला दिवसा वीज मिळावी, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.

भोसले म्हणाले की, आमच्या उपोषणाला आसपासच्या गावच्या ग्रामस्थांनीही पाठींबा दिला असून दिवसा लाईट मिळावी अशी मागणी केली आहे. गेली काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून हा परिसर बिबट्या प्रवण क्षेत्रच बनला आहे. तसेच रात्री विषारी साप वगैरे या परिसरात फिरत असतात त्यामुळे आम्हाला शेती पंपाला दिवसा लाईट मिळावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली असून शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्राकडे आता लोकप्रतिनिधींनी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी तुकाराम भोसले यांनी सांगितले. विद्युत वितरण विभागाचे काही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढला असताना शेतकऱ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे.

वाघाळे येथे उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आठवड्यातून तीन दिवस रात्री व चार दिवस दिवसा वीज पुरवठा देण्यात येईल, असा तोडगा काढला असून तो मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी उपोषण सोडले आहे.– संतोष पंचरास, सहाय्यक अभियंता

Leave A Reply

Your email address will not be published.