तेहरान – मद्यपान केल्याने करोना होत नाही अशी अफवा इराणमध्ये पसरली होती. त्यामुळे अनेकांनी करोना होऊ नये म्हणून मद्यपान केले. त्यामुळे इराणमध्ये 600 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3000 जणांची प्रकृती बिघडली आहे.
दारुचं सेवन करणे हे करोना विषाणूवरील उपचार नाही, तर हे त्यापेक्षा जास्त घातक आहे. यामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे, असे इराणचे न्यायिक प्रवक्ते घोलम होसैन एसमेली यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत करोना विषाणूवर कुठलीही उपचार किंवा लस उपलब्ध झालेली नाही. फक्त काही अशा मोजक्या औषधी उपलब्ध आहेत ज्यामुळे करोनाच्या सुरुवातीची लक्षणं कमी करण्यात मदत करतात.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भानंतर इराणच्या संसदेने मंगळवारी पहिली बैठक घेतली.
यामध्ये विधानसभेच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त, 290 सभासदांनी हजेरी लावली. मात्र, या बैठकीला ज्येष्ठ राजकारणी आणि वक्ते अली लारीजानी अनुपस्थित होते. त्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. इराणच्या संसदेतील जवळपास 31 सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. तसेच, करोना विषाणूच्या केसेस पुढे आल्यानंतर संसदेचे कामकाज तहकुब करण्यात आले.
इराणमध्ये करोना विषाणूमुळे 62,589 लोकांना संसर्ग झाला आहे आणि जवळपास 3,872 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, इराण मृतांचा आकडा कमी दाखवत असल्याचा आरोपही केला जात आहे.