“कुछ कुछ होता है’मध्ये होत्या चुका

करण जोहर हा अशा निर्माता-दिग्दर्शक आहे जो आपल्या चुका दामटून सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. पण अलीकडेच मेलबर्नमध्ये झालेल्या “इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये करण जोहरला आपल्या एका सिनेमाबद्दल दिलगिरी व्यक्‍त करायला लागली. डायरेक्‍टर म्हणून आपल्या पहिल्या “कुछ कुछ होता है’ या सिनेमातील काही चुका त्याने मान्य केल्या. “कुछ कुछ होता है’ मधील अभिनेत्रींचे चित्रण नैतिक दृष्ट्‌या योग्य नव्हते, हे आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ध्यानात आणून दिले. होते. या मुद्‌द्‌यावरून शबाना आझमी करण जोहरवर नाराज झाल्या होत्या. करण जोहरने ही बात प्रांजळपणे कबूल केली.

“कुछ कुछ होता है’ हा सिनेमा राजकीयदृष्ट्‌या सगळ्यात चुकीचा होता. लहान केस असलेली मुलगी आकर्षक नसते. पण हीच मुलगी केस लांब झाल्यावर सुंदर दिसू लागते हे चुकीचे चित्र आहे असे शबाना म्हणाल्या होत्या. आधुनिक असलेली मुलगी अध्यात्मिक असू शकत नाही. तसे झाल्यास आश्‍चर्य वाटावे, असे सिनेमात भासवले केले आहे. “कुछ कुछ होता है’मध्ये अभिनेत्रींचे रोल अधिक चांगल्या प्रकारे लिहिले जायला हवे होते. त्यांच्या रोलमुळे प्रेक्षकांच्या मनात काही चुकीचा संदेश जायला नको ही काळजी घ्यायला हवी होती, हेही शबाना आझमी यांनी करणला सुनावले.

1998 मध्ये रिलीज झालेल्या “कुछ कुछ होता है’ने बॉक्‍स ऑफिसवर तूफान यश कमावले. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांचे रोल असलेला “कुछ कुछ होता है’ त्यातल्या गाण्यांमुळे सुपरहिट झाला होता. या सिनेमापासून करण जोहरने डायरेक्‍टर कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून तो आघाडीचा दिग्दर्शक बनला. पण पहिल्याच सिनेमातील चुकांमुळे त्याच्यावर उघडपणे माफी मागण्याची नामुष्की ही आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.