नवी दिल्ली – ठाण्यातील एका जमिन प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात मलाही गोवण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नाही तर या प्रकरणी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचेही आदेश देण्यात आले होते. हे सर्व अनिल देशमुख यांचे स्विय सहाय्यक संजय पांडे यांच्या मार्फत सुरू होते.
याशिवाय गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांनाही अटक करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. याबाबतचे व्हिडीओ पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे. वेळ पडल्यास ते आपण सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परमबीर सिंहांनी नवे आरोप करताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. हे करत असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही या सर्व कटात कसा सहभाग होता हे सांगून कसा दबाव होता याची जंत्रीच त्यांनी मांडली आहे.
परमबीर सिंह म्हणाले, अनिल देशमुख गृहमंत्री असताना सर्व सिस्टम खराब करून टाकण्यात आली होती. वसूलीसाठी ते थेट अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलवत होते. बदल्यांसाठी पैसे घेतले जात होते. अनेकांचे पैसे घेवून काम केले जात नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय मलाही बोलवून शंभर कोटीचे टार्गेट दिले होते. त्यासाठी वसूली आणि छापे टाकण्यास सांगितले जात होते.
अनिल देशमुखांकडून आपल्यावर वसूलीसाठी दबाव टाकला जात होता. शिवाय परस्पर अधिकाऱ्यांना संपर्क केला जात होता. अधिकारीही त्रस्त झाले होते. ते सर्व गोष्टी मला सांगत होते. त्यामुळे या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
त्याच बरोबर शरद पवार, जयंत पाटील यांनाही सांगितले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहावे लागले, असे त्यांनी सांगितले.
सिल्वर ओकवर बैठक
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बैठक पार पडली होती. या बैठकीला शरद पवार, अनिल देशमुख, अनिल गोटे आणि पी.पी. चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासंदर्भात दबाव आणला. मात्र, मी त्यांना नकार दिला. मी अशाप्रकारे कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितले, असं परमबीर सिंह म्हणाले.