फोनही लागेना अन्‌ नेटवर्कही मिळेना

पुरंदर तालुक्‍यात मोबाइल कंपन्यांचे कव्हरेजच गुल
ग्राहक हैराण : तक्रार करायची तरी कोणाकडे?
सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्‍यातील ग्रामीण भागासह शहरी भागात सध्या नेटवर्क मिळेना अन्‌ फोन लागेना..! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल सीमकार्ड कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मागील दोन आठवड्यांपासून ही समस्या सुरू झाली असल्याचे विविध कंपन्यांच्या ग्राहकांच्या तक्रारीवरून दिसून येते. मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे… थ्री-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू-जीची सेवा मिळणे… वापर कमी असताना देखील बिलच जास्त येणे… शेजारी-शेजारी फोन असताना देखील फोन न लागणे… अशा विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल सीमाकर्ड कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये आयडिया, एअरटेल, रिलायन्स, व्होडाफोन, यांच्यासह सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचा सुद्धा सहभाग आहे.

सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे. शहरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाइल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. बीएसएनएल ही कंपनी शासनाची आहे. मात्र, या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले.

बीएसएनएल प्रीपेड सेवा घेतलेली आहे, पण अनेक वेळा मोबाइलचे नेटवर्क असताना फोन लागत नाही. दुसऱ्या व्यक्‍तीने आपल्याला फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. शहरातील अनेक कार्यालयात व परिसरात बीएसएनएल कंपनीच्या मोबाइलला नेटवर्क नसते कमकुवत नेटवर्क नसल्यामुळे इंटरनेटला गती मिळत नाही त्यामुळे या सोबतच दुसऱ्या कंपनीचे सिमकार्ड नाईलाजास्तव वापरावे लागते.
– संदीप जगताप, ग्राहक, बीएसएनएल कंपनी

आयडीया कंपनीची सेवा चांगली असल्याचे ऐकून आयडिया कंपनीचे सीमकार्ड खरेदी केले; मात्र गेल्या महिन्याभरापासुन आयडिया कंपनीचे नेटवर्क अतिशय कमी असल्यामुळे फोन करण्यात व सुविधा वापरण्यात अडचणी येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर उद्योगधंद्यावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
– संजय चव्हाण, ग्राहक, आयडिया कंपनी

पुरंदर तालुक्‍यात सध्या मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क खूपच कमी असल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सासवड शहरात बहुतांश भागातील इमारतींमध्ये पार्किंगमध्ये मोबाइलचे नेटवर्क येत नाही, त्यामुळे फोन अचानक बंद होतात इंटरनेट वापरण्यासाठी अडचणी येत आहेत यामुळे नागरिकांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, याची मोबाइल कंपन्यांनी त्वरित दखल घेऊन नेटवर्क सुरळीत करावे.
– चंद्रकांत गिरमे, ग्राहक, व्होडाफोन कंपनी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)