गाझीयाबाद – उत्तर प्रदेशच्या गाझीयाबाद येथे अंड्यातून प्लॅस्टिक निघाल्यामुळे खळबळ उडाली असून अंडी खाणाऱ्या व्यक्तींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अंड्यातून प्लॅस्टिक निघाल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे.
दरम्यान, गाझीयाबाद येथे केमिकल आणि प्लॅस्टिकचा वापर करून अंडी तयार करण्याचा कारखानाच सुरू झाला असल्याच्या बातम्या या अगोदरच प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र आता चक्क त्याचा पुरावा सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने त्याच्या कुत्र्यासाठी अंडी विकत आणली होती त्यात त्याला हा प्रकार आढळून आला.
तक्रार करण्यात आल्यानंतर आता चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती एसडिएम संतोष कुमार राय यांनी दिली आहे. हे नकली अंडे आरोग्याला अत्यंत घातक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच ते कसे ओळखायचे याची पध्दतही सांगण्यात आली आहे. खरे अंडे जड असते आणि ते पाण्यात टाकले तर चटकन तळाशी जाते.
नकली अंडे प्लॅस्टिक किंवा सिंथेटीकचे असल्यामुळे वजनाने हलके असते. पाण्यात टाकले की तरंगते. या पध्दतीचा उपयोग करून अंड्याची ओळख पटवता येऊ शकते. तसेच खरे अंडे चटकन जळत नाही. याउलट नकली अंडे जळायला वेळ लागतो आणि त्याचा वेगळा वासही येतो. हे अंडे फोडायलाही वेळ लागतो. अशा काही पध्दती नकली अंडी ओळखण्याच्या संदर्भात सांगण्यात आल्या आहेत.