मुंबई – उपनगरातील मुलुंड परिसरातील एका 67 वर्षीय नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजोबांचे काही दिवसांपूर्वी एका महिलेशी इमारतीमधील पार्किंगवरून भांडण झाले होते.
त्यावेळी त्या महिलेने आजोबांना तुमच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर आजोबा अस्वस्थ झाले होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
खुशाल दंड असे आजोबांचे नाव आहे. महिलेने धमकी दिल्याने आजोबांनी लोकल ट्रेनखाली आत्महत्या केली. या प्रकरणी खुशाल दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून महिला कुमकुम मिश्रा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर मिश्रा यांना अटकही करण्यात आली. मात्र, आता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली आहे.
पार्किंगसारख्या क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण, त्यात महिलेने विनयभंग केल्याची दिलेली धमकी यामुळे धक्का बसलेल्या दंड यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. यामुळे आता त्यांची पत्नी एकटी पडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.