खासदार गिरीश बापट यांचे विमानतळ प्रशासनाला निवेदन
पुणे – देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत सैनिकांसाठी विमानतळावर स्वतंत्र प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था केली जावी, अशा मागणीचे निवेदन खासदार गिरीश बापट यांनी विमानतळ प्रशासनाला दिले आहे. या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी बापट यांचे आभार मानले.
हवाई वाहतूक तज्ज्ञ वंडेकर हे 2018 सालापासून स्वतंत्र प्रतिक्षालयाबाबत मागणी करत होते. यासाठी विमानतळ प्रशासनाला अनेकवेळा अर्जदेखील केला. मात्र, विमानतळ प्रशासनाकडून नेहमीच “आमच्या धोरणात ही बाब नाही’ असे उत्तर दिले जात होते. वंडेकर यांनी याबाबत खासदार बापट यांच्याशी चर्चा केली.
या मागणीसाठी बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, नुकतेच विमानतळ प्रशासनाला पत्र लिहले आहे. या पत्रात स्वतंत्र प्रतीक्षा कक्षाच्या मागणीबाबत गंभीरतेने विचार करावा, असे आवाहनदेखील केले आहे. दरम्यान, दक्षिण मुख्यालयानेदेखील विमानतळ प्रशासनासोबत झालेल्या त्यांच्या संयुक्त बैठकीत विमानतळावर सैन्यदलासाठी स्वतंत्र जागा देण्याबाबत मागणी केली होती.
शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी विमानतळावर राखीव जागा मिळाल्यास सैन्य दलास जलद हालचाल करणे शक्य होईल, त्यामुळे विमानतळ प्रशासनाने दलासाठी स्वतंत्र-राखीव जागेची व्यवस्था करावी, असे आवाहन लष्कर प्रशासनाने केले होते.