नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंद्र बात्रा व उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्यातील वाद संपण्याची कोणतीही चिन्हे अद्यापही दिसत नसल्याचेच स्पष्ट होत आहे. एकीकडे बात्रांची पाठराखण करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरीही बात्रा यांना दिलेली क्लीनचीट अयोग्य असून या प्रकरणाची नव्याने चौकशी केली जावी अशी मागणी मित्तल यांनी केली आहे.
भारतीय ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदील सुमारीवाला यांनी शनिवारी बात्रा यांच्याबाबत समर्थन व्यक्त केले होते. तसेच यापूर्वी देखील संघटनेशी संबंधित अनेक सदस्यांनी बात्रा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. आता यामुळे व्यथित झालेल्या मित्तल यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे या प्रकरणाची चौकशी नव्याने घेतली जावी अशी मागणी केली आहे. बात्रा आणि मित्तल यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहेत. बात्रा यांनी संघटनेचे अध्यक्षपद मिळवताना जी कागदपत्रे सादर केली त्यात जी माहिती दिली ती चुकीची असून आंतरराष्ट्रीय संघटना याबाबत दुर्लक्ष का करत आहे, असा सवालही मित्तल यांनी केला आहे.
मित्तल यांनी बात्रा यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उभे करताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. बात्रा यांची नियुक्ती करताना अनियमितता झाल्याचा आरोपही मित्तल यांनी केला होता. यावर भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी मित्तल यांनाच एकाकी पाडले आहे. ऑलिम्पिक संघटनाच नव्हे तर भारतीय हॉकी संघटनेनेही बात्रा यांचीच बाजू घेत मित्तल यांच्या मतांवर टीका केली आहे. बात्रा एकाच वेळी दोन संघटनांचे पद कसे काय भूषवू शकतात, असा सवालही मित्तल यांनी केला आहे.