मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या डोंबिवलीमध्येच मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी त्याचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर दुसरी कडे डोंबिवलीतले मनसेचे गटनेते मंदार हबळे यांनी भाजपची वाट धरली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षातील दोन बडे नेते राज ठाकरेंची साथ सोडून गेल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
दरम्यान, पक्ष्याच्या बिकट परिस्थिती मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काहीसे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “एक आहे.. पण “नेक” आहे असं नांदगावकर यांनी म्हंटल. सध्या त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
“कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला व त्याला विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना हि कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठे पक्षांतर अनुभवले आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतो.
https://www.facebook.com/MeBalaNandgaonkar/posts/3648893635165958
तसेच स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवली मध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही, तसेच जनता सगळे जाणून आहे व आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी. राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत, लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे एकच आहे.
आमचा एक आहे पण “नेक” आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली तील सर्वांना एकच विनंती कि अशा पक्षांतरा ने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की. आपला नम्र..! असं बाळा नांदगावकर यांनी म्हंटलं आहे.