“पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही…”म्हणणाऱ्या अमोल कोल्हेंवर नेटकरी भडकले

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे प्रशासनावर टीका केली. मात्र त्यांनी केलेली टीका नेटकऱ्यांना फारशी आवडली नसल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी केलेल्या टिकेवरून कोल्हे हे सध्या ट्रोल होताना दिसत आहेत. पुणे विमानतळावर असलेल्या शनिवारवाडा तसेच पेशव्यांच्या चित्रांवर कोल्हे यांनी आक्षेप घेत एक फोटो ट्विट केला. त्यावरूनच नेटकऱ्यांनी अमोल कोल्हे यांना चांगलेच सुनावले आहे.

डॉ. कोल्हे यांनी पुणे विमानतळावरचे काही फोटोज आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शनिवारवाडा तसंच पेशव्यांशी संबंधित काही दृश्य साकारली आहेत. या फोटोंवर आक्षेप घेत डॉ. कोल्हे म्हणतात, “पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे विमानतळ प्रशासनाला विसर पडला की काय?”

त्यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर नेटकऱ्यांनीच त्यांना प्रतिप्रश्न करत सुनावलं आहे. “छत्रपतींचा विसर कोणालाच पडू शकत नाही पण असे फोटो ट्विट करुन जर नवा वादच तयार करायचा असेल तर काय म्हणणार? आणि इतकाच खरंच पेशव्यांबदल आदर असेल तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे नामकरण करा म्हणावं पुणे एअरपोर्टचे”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर “आपण खासदार आहात, आपण प्रत्यक्ष बोलुन कृती करू शकला असतात, ह्या प्रकारे समाजात तेढ निर्माण करू नये. महाराजांचा आदर्श समोर ठेवावा”, असं मतही एका युजरने व्यक्त केलं आहे.

त्यांच्या या ट्वीटशी नेटकरी फारसे सहमत असल्याचं दिसलं नाही. “तुम्ही प्रसिद्धीसाठी महाराजांवर मालिका केलीत त्यात वढू तुळापूर दाखवलं का?”, असा सवालही एका युजरने विचारला आहे. तर तुमच्याकडून हे बदल अपेक्षित असल्याचंही एका युजरने सांगितलं आहे. अनेकांनी वढू तुळापूरकडे जाणाऱ्या रस्त्याबद्दल तक्रार करत तो दुरुस्त करण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हेंकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.