पुरातत्व विभाग : धिंगाणा घालणाऱ्यांवर होणार कारवाई
पवनानगर – किल्ले तिकोणा ऊर्फ वितंडगडावर गुहा सापडल्यामुळे हा किल्ला अधिक चर्चेला आला. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे किल्ले तिकोणा गडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येत रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
काही पर्यटक गडावर मद्यपान, धूम्रपान, मांसाहार ही करतात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करतात. गडावर धिंगाही घालतात, गडावर पाहिजे तसे वागतात त्यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत चालले आहे. त्यामुळे गडावर रात्री जे पर्यटक राहतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांनी केली होती. त्याचे पार्श्वभूमीवर शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने पुरातत्व विभाग यांनी या प्रकरणात दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.
पुरातत्व खात्याने पुरातत्व तत्काळ या गोष्टीची दखल घेत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच तिकोणापेठ ग्रामपंचायत यांना गडावर रात्री मुक्काम करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी सूचना पत्रान्वये करण्यात आली आहे.
या सूचनेप्रमाणे कोणी किल्ले तिकोणा गडावर रात्रीच्या वेळी मुक्काम करताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत व पुरातत्व विभाग यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.