‘महिला आमदारांसाठी विधानभवनात स्वतंत्र कक्षच नाही’

महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महिला आमदारांच्या तक्रारी


आमदार माधुरी मिसाळ यांनी अधिवेशनात मांडली कैफियत

पुणे – संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातील जनतेचे प्रश्‍न हिरिरीने मांडणाऱ्या महिला आमदारांचीच विधानसभेत कुचंबणा होते, अशी तक्रार आमदार माधुरी मिसाळ यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा अधिवेशनात मांडली. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मिसाळ यांच्या मागणीची प्रशासनाने नोंद घेऊन कार्यवाही करायच्या सूचना केल्या.

विधीमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, त्याच्या शून्य प्रहरात त्यांनी सर्वपक्षीय महिला आमदारांच्या समस्या मांडल्या. पूर्वी महिला आमदारांची संख्या कमी होती मात्र आता ती वाढत आहे. गेल्यावेळी 19 महिला आमदार निवडून आल्या होत्या तर यावेळी ते संख्या 24 झाली आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या विधानभवनात महिला आमदारांसाठी स्वतंत्र कक्ष नाही, पुरेशी जागा नाही अशी अडचण त्यांनी सभागृहात सांगितली.

अशा परिस्थितीत महिला आमदारांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, तेथे पुरेशी जागा आणि बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा महिला आमदारांच्या माफक अपेक्षा असल्याचे मिसाळ यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सभागृहात सांगितले.

विधानभवनाची 20 मजली इमारत आहे. त्यात महिला आमदारांच्या वाट्याला केवळ 60 ते
70 चौरस फूट एवढीच जागा देण्यात आली आहे. या कक्षात वावरासाठी पुरेशी जागाही नाही. एवढेच नव्हे, तर अन्य दालनातील काढून टाकलेले फर्निचर येथे आणून ठेवले आहे. अन्यत्र वापरलेल्या साहित्य आणि साधनांचा या ठिकाणी वापर केलेला आहे.
– माधुरी मिसाळ, आमदार, पर्वती मतदारसंघ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.