पाणीकपातीतून तूर्तास दिलासा नाहीच

आयुक्‍तांची माहिती ः साडेचार महिने पुरेल एवढाच पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 30 टक्‍के कमी पाणीसाठा
पिंपरी – आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पवना धरण केवळ 44 टक्के भरले आहे. हा पाणीसाठा साडेचार महिने पुरेल एवढाच आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपात मागे घेतली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. दिवसाआडच्या पाणीपुरवठ्यामुळे पाण्याच्या तक्रारींची संख्या नगण्य झाली असून पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मावळातील पवना धरणातून पिंपरी – चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो.

बुधवारी सकाळी पवना धरणात 44 टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरण सुमारे 75 टक्‍के भरले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊसही सुमारे 600 मिमी कमी झाला आहे. बुधवार सकाळपर्यंत धरणक्षेत्रात 1118 मिमी पाऊस झाला आहे. तर याच दिवसापर्यंत गेल्यावर्षी 1779 मिमी पाऊस झाला होता. यंदा पावसाला सुरुवातही उशीरा झाली असून जुलै महिन्यातील एक आठवडा सोडल्यास अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. एक जूनपासून पडलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात केवळ तीस टक्‍क्‍यांची भर घातली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही परतीच्या पावसाने ओढ दिल्यास मात्र पाणीटंचाईचे संकट तीव्र होऊ शकते. या सर्व शक्‍यता लक्षात घेत प्रशासन पाणी कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. याबाबत आयुक्‍त म्हणाले, दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने तक्रारींचा ओघ कमी झाला. पाणी जास्त दाबाने येऊ लागले. गृहनिर्माण संस्थांच्या वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहचू लागले आहे. महापालिका आता दररोज 420 एमएलडीच पाणी उपसा करत आहे. तर 25 टक्के पाणीकपात सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)