विमानतळ रद्द होण्याशी आढळरावांचा संबंध नाही -शिवतारे

पाबळ-आढळरावांमुळे खेडचा विमानतळ गेला हा विरोधकांनी केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे, डीजीसीए व भारतीय विमानतळ प्राधिकरण या संस्थांच्या तंत्रज्ञांनी खेड तालुक्‍यात विमानतळासाठी 6-7 जागा पाहिल्या. परंतु नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केल्यावर त्यांना एकही जागा तांत्रिकदृष्टया योग्य वाटली नाही, त्यामुळे विमानतळ रद्द होण्याशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधाचा काडीचाही संबंध नाही, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पाबळ येथे ते बोलत होते. राष्ट्रवादीचे पुढारी विमानतळासंदर्भात खोडसाळपणाची व चुकीची वक्तव्ये करुन जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. थिटेवाडी परिसरातील केंदूर, पाबळसह 12-13 गावांची शेतीसाठीच्या पाण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी आहे.

खासदार आढळराव यांनी आघाडी सरकारच्या काळात या मागणीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला, बैठका घेतल्या. पण शेतकऱ्यांना पाणी द्यायची राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छाच नव्हती. त्यांनी धरणातील पाणी वाटपाचे आधीच नियोजन झाल्याचे सांगून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली. राज्यात युतीचे सरकार आल्यावर आढळरावांनी पुन्हा माझ्यासमवेत बैठका घेतल्या, मी स्वतः लक्ष घालून कोणती योजना राबविता येईल याचा अभ्यास केला. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंजवणीच्या धर्तीवर बंद पाईपलाईनमधून पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे आदेश दिले. कलमोडी प्रकल्पाला आम्ही सुधारीत प्रशासकीय मान्यताही दिली असून डीपीआरचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात पाबळ, केंदूरसह 12-13 गावांना पाणी देणार, हा या विजय शिवतारेंचा शब्द आहे.

आमदार शरद सोनवणे म्हणाले, यावेळी तुम्हाला नुसता खासदार निवडून आणायचा नाही, दादांच्या रूपाने केंद्रात मंत्री निवडून द्यायचा आहे. तुम्हीच विचार करा. फक्त खासदार असताना आढळराव दादांनी 14 हजार कोटींची कामे केली आहेत. मग मंत्री झाल्यावर तर विकासाची गंगाच शिरूर लोकसभा मतदारसंघात येणार आहे. काल संध्याकाळी तुफान गर्दीत झालेल्या या प्रचारसभेत भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेनेच्या जयश्री पलांडे, सोपान जाधव यांची भाषणे झाली, तर पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी प्रास्ताविक केले. या सभेला भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, समाधान डोके, अरूण गिरे, रवींद्र करंजखेले, सूनील बाणखेले, सुरेश भोर, अनिल काशिद, बापुसाहेब मासळकर, बापुसाहेब शिंदे, दादासाहेब खर्डे, शशिकांत बाणखेले आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.