उपनगरांच्या पाणी पुरवठ्यात कपात नाही

लॉकडाऊनमध्ये वापर कमी असल्याने धरणांत मुबलक साठा; करोनाच्या संकटात दिलासा

सिंहगड रोड – मे महिन्याच्या या कालावधीत दरवर्षी उपनगरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. नगरसेवकांच्या हातापाया पडल्याशिवाय, पाणी पुरवठा विभागावर मोर्चा, निवेदने दिल्याशिवाय पाणी येत नाही. याच कालावधीत पाण्यासाठी पायपीट करावी लागते; परंतु यावर्षी करोनाच्या संकटात पाणी कपात टळल्याने उपनगरवासियांना काहीसा दिलासा मिळत आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात अनेक दुकाने, हॉटेल अगदीच काय तर कंपन्या सुरू करण्याबाबतही सूट देण्यात आली आहे; परंतु विविध कारणांतून आजही कंपन्या, व्यवसाय वेगाने सुरू झालेले नाहीत. याच कारणातून पुणे शहर तसेच उपनगरांतील भागात व्यावसायिक पाणी वापर होत नसल्याने गेल्या दोन महिन्यांत धरणांतील पाणी पातळी कायम आहे. यामुळेच मे महिन्यांत जवळपास तळ गाठणाऱ्या धरणांत समाधानकारक पाणीसाठा आहे.

पुणे शहर तसेच मोठ्या उपनगरांचा विचार करता प्रत्येक महिन्याला सरासरी दीड ते दोन टीएमसी पाण्याचा वापर केला जातो; परंतु लॉकडाऊनचे चार टप्पे लक्षात घेतले तर शहर तसेच उपनगरांतून होणारा पाण्याचा फक्त घरगुती वापरच झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा कायम आहे. चौथ्या टप्यात शेतीसाठीचे पहिले आवर्तन खडकवासला धरणांतून 15 दिवस सोडण्यात आले आता दुसरे आवर्तनही सुरू झाले आहे.

परंतु शहर तसेच उपनगरांतून होणारी पाण्याची मागणी लक्षात घेता कमीतकमी धरणांत पाच ते सहा टीएमसी पाणी शिल्लक ठेवले जाणार आहे. हा पाणीसाठा किमान 15 जुलैपर्यंत वापरता येईल इतका असल्याचे सांगण्यात आले.

पुणे शहर तसेच उपनगरांतून पाण्याची मागणी मे महिन्यांत वाढत असली तरी धरणांतील पाण्याचे नियोजन म्हणून सरासरी 15 ते 20 टक्के पाणी कपात केली जाते. याकरिता दिवसाआड तर कधी दोन दिवसांनी उपनगरांत पाणी येते. परंतु, लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर शहर तसेच उपनगरांतून पाणीपुरवठ्याचा वापर कमी असल्याने ऐन उन्हाळ्यातही उपनगरांच्या पाणी पुरवठ्या कपात करण्यात आलेली नाही.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही पाण्याचा वापर कमीच आहे. आता, मॉन्सूनही वेळेत येण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच खडकवासला धरण साखळीतील धरणांतही पाण्याचा मुबलक साठा आहे. गेल्या वर्षी धरण साखळीत 4.24 टीएमसी (14.55 %) एवढा पाणीसाठा होता तर यावर्षी 8.52 टीएमसी (29.23 %) पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीसाठा शिल्लक ठेवण्यासाठी शहर तसेच उपनगरांसाठीचा पाणीपुरवठा कपात करण्याची वेळ नाही.

धरणसाखळी पाणीसाठा…
वरसगाव : 3.73 टीएमसी (29 टक्के)
पानशेत : 4.37 टीएमसी (41 टक्के)
खडकवासला : 0.52 टीएमसी (26 टक्के)

Leave A Reply

Your email address will not be published.