नवी दिल्ली – व्होडाफोन आयडिया कंपनीने प्राधान्यक्रमाने सेवा देण्याचा प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनला दूरसंचार नियामक अधिकारिणीने म्हणजे ट्रायने रोखले आहे. याविरोधात व्होडाफोन कंपनी दूरसंचार क्षेत्रातील लवाद टीडीसॅटकडे गेली होती. मात्र, ट्रायच्या आदेशाला स्थगिती देण्यास टीडीसॅटने नकार दिला आहे.
आता या प्रकरणावरील सुनावणी 16 जुलै रोजी होणार आहे. व्होडाफोन कंपनीने काही ग्राहकांना अधिक वेगवान सेवा देण्याचा प्लॅन जाहीर केला होता. मात्र, त्यामुळे इतर ग्राहकांना सेवा देण्यावर परिणाम होणार आहे का, अशी विचारणा करून यासंदर्भात ट्रायने कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
तोपर्यंत त्यांची अंमलबजावणी करू नका, असे सांगितलेले आहे. अशाच प्रकारचा प्लॅन एअरटेल कंपनीनेही जाहीर केलेला आहे. एअरटेल कंपनीलाही याबाबत स्पष्टीकरण मागून त्याची अंमलबजावणी करू नका म्हणून सांगितले आहे.