भोपाळ : भोपाळमधील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील पित्याने कन्येच्या जन्माचा आनंद असा काही साजरा केला की, लोकही आश्चर्याने पहात राहिले आणि त्याच्या आनंदात सहभागी झाले. भोपाळमधील कोलार मार्गावर राहणाऱ्या आंचल गुप्ता या पाणीपुरी विक्रेत्याच्या कुटुंबात 17 ऑगस्ट रोजी कन्येचा जन्म झाला. कन्येचा जन्म झाल्याच्या आऩंदात त्यांनी कोलार भागातील लोकांना 50 हजार पाणीपुरी मोफत खाऊ घातल्या. त्यासाठी पाच तास दहा स्टॉल लावण्यात आले होते. लोकांनी देखील रांगा लावून पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
गुप्ता कुटुंबात आलेल्या मुलीचे नाव त्यांनी अनोखी असे ठेवले आहे. त्यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे. कन्येचा जन्म होण्याआधीच तिच्या आगमनाचा आनंद कसा साजरा करायचा हे त्यांनी ठरवले होते. आंचल यांनी सांगितले की, लग्नानंतर पहिले अपत्य मुलगी व्हावी अशी प्रार्थना देवाकडे केली होती. पहिला मुलगा झाला परंतु, दोन वर्षांनी आमच्या कुटुंबात मुलीचे आगमन झाले आहे. देवाने आमची प्रार्थना ऐकल्यामुळे हा आनंद सर्वांसोबत साजरा करण्याचे ठरवले. मग पत्नी आणि कुटुंबियासोबत चर्चा करून त्यांनी एक दिवस सगळ्यांना मोफत पाणी-पुरी खाऊ घालण्याचा निर्णय घेतला.
रविवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते संध्याकाळी सहा वेळेत त्यांनी 50 हजार पाणीपुरी लोकांना मोफत खाऊ घातल्या. त्यासाठी दुकानाबाहेर खास मांडव टाकून त्याठिकाणी त्यांनी दहा स्टॉल लावले होते.
आंचल हे मूळचे रायसेन देवरी येथी आहेत. गेल्या 14 वर्षांपासून ते कोलार मार्गावर रहात आहेत. त्यांची पाणी-पुरी परिसरात वेगळ्याच चवीसाठी प्रसिद्ध आहे. रोज त्यांच्या दुकानात सुमारे पाच हजार पाणी-पुरी विकल्या जातात.